साध्य, साधन, साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य - अनिल वळसंगकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:58 PM2018-02-14T12:58:09+5:302018-02-14T13:07:28+5:30
जळगावात राष्ट्रीय जनकल्याण समितीच्यावतीने पाच जणांना सेवा गौरव पुरस्कार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १४ - सगळे काम एक दिवस, १५ दिवस करणे सोपे आहे मात्र सातत्याने १ हजार दिवस तेच ्रकाम, सेवा करणे अवघड आहे. मात्र सेवालयातून भूक भागवण्याचे काम अविरत सुरू असून या सोबतच तेथे स्वाभिमानही रुजविला जात आहे. साध्य, साधन व साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य आहे व यातूनच इतरांनाही कार्याची प्रेरणा मिळते, असा विश्वास समुपदेशक तथा योजक संस्थेचे संचालक अनिल वळसंगकर यांनी व्यक्त केला. मात्र दुसरीकडे साधनांच्या अतिरेकामुळे संस्कारांचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही वास्तव त्यांनी या वेळी मांडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या सेवालयाचा चौथा वर्धापन दिन कांताई सभागृहात साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष काबरा उपस्थित होते. जिल्हा कार्यवाहक विनोद कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी चित्रफितीद्वारे सेवालयाच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते भारतमाता पूजन करण्यात आले.
कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्य करा
तन, मन आणि धनपूर्वक सेवाकार्य करायला हवे. तिन्ही प्रकारे एकाच वेळेला करणे जरी शक्य होत नसेल तरीदेखील कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्याशी जुळावे आणि इतरांना यात जोडावे, असे आवाहनही अनिल वळसंगकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांनी मनोगतात सांगितले की, सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण हे शेगाव गजानन महाराज देवस्थान आहे. पूर्वीची संस्कृती आणि आताची संस्कृतीमध्ये बदल झालाय. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला वृद्धाश्रम उभारावे लागतात. शिकून शहाणे आपण झालो पण संस्कारांनी शहाणे झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक घरात मोबाइल आहे पण पुस्तक नाही. हे पुस्तक महत्वाचे आहे.
सेवा गौरव
या कार्यक्रमात सेवाकार्य करणाºयांचा गौरव करण्यात आला. यामध्ये विष्णू बाणाईत, अंजली बाविस्कर, वंदना पवार, धनंजय तिवारी, डॉ. नीलिमा सेठिया यांचा पुषगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी वंदना पवार, विष्णू बाणाईत यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अपूर्वा वाणी, सुनील याज्ञिक यांनी केले तर नंदू शुक्ल यांनी आभार मानले.