दुर्गम भागातील रुईखेडा येथे ९८ मतदार
By admin | Published: February 16, 2017 12:37 AM2017-02-16T00:37:54+5:302017-02-16T00:37:54+5:30
भुसावळ विभाग : पोलिसांचे पथसंचलन, सातपुड्याच्या कुशीतील पाच गावांसाठी दुचाकी अधिग्रहीत
भुसावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़ भुसावळ विभागात बुधवारी निवडणूक कर्मचाºयांना निवडणूक साहित्यासह ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले़ दुपारपर्यंत सर्वच ठिकाणचे कर्मचारी साहित्यासह खाजगी वाहनांनी रवाना झाले़
यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागासाठी प्रथमच पाच दुचाकी अधिग्रहीत करण्यात आल्या व दुचाकींद्वारे हे कर्मचारी साहित्यासह रवाना झाले़
४भुसावळ
तीन गटांसह सहा गणांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़ बुधवारी सकाळी १० वाजता यावल रोडवरील शासकीय गोदामात निवडणूक कर्मचाºयांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले़ प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मीनाक्षी चव्हाण-राठोड, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर, गटविकास अधिकारी सुभाष मावळे आदींची उपस्थिती होती़
११५ मतदान केंद्र
भुसावळ तालुक्यात ११५ मतदान केंद्र आहेत़ त्यात नऊ गावातील ४१ केंद्र (बुथ) संवेदनशील आहेत़ निवडणुकीसाठी एकूण २३० ईव्हीएम आहेत तर ३० रिझर्व्ह आहेत़ एक लाख पाच हजार १८० मतदार आहेत़ त्यात ५६ हजार २६९ पुरुष तर ४९ हजार ९०१ स्त्री मतदार आहेत़ झोनल अधिकाºयांसह ७७१ निवडणूक कर्मचारी तैनात असून ६६ खाजगी वाहने अधिग्रहीत करण्यात आली़
४यावल
यावल तालुक्यातील १६० मतदान केंद्रासाठी मतदान कर्मचारी निवडणूक साहित्यासह बुधवारी सकाळी रवाना झाले़ अतिदुर्गम भागातील पाच गावांसाठी मतदान कर्मचारी मोटरसायकलने रवाना झाले आहेत. प्रशासनाने पहिल्यांदाच मतदान प्रक्रीयेसाठी मोटरसायकली अधिग्रहीत केल्या आहेत.
चोपडा रस्त्यावरील हतनूर वसाहतीच्या आवारात उभारलेल्या शामियान्यात कर्मचाºयांना मतदान यंत्रे, मतदान साहित्य व मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे १० गण असून एक लाख ४७ हजार ४८० मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ त्यात ७८ हजार ४०० पुरुष तर ६९ हजार ८० स्त्री मतदार आहेत़
तालुक्यात १९ झोन
तालुक्यात १६० मतदान केंद्र असून १९ झोन तयार करण्यात आले आहेत़ प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक या प्रमाणे १६० मतदान केंद्रासाठी १६० मतदान कर्मचारी तर १५ पथक आरक्षित असे १७५ पथकांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात एक केंद्राध्यक्षासह चार मतदान अधिकारी एक शिपाई व एक पोलीस असे पथक असणार आहे़
सर्वात कमी मतदान अती दुर्गम भागातील रुईखेडा येथे ९८ तर सर्वात जास्त मतदान मालोद येथील केंद्रावर एक हजार ३९० इतके आहे.
मतदान कर्मचारी व मतदान यंत्रे वाहतुकीसाठी प्रशासनाने १३ बसेस २८ जीप तसेच पाच दुचाकी अधिग्रहीत केल्या आहेत़ सातपुड्याच्या कुशित असलेल्या अती दुर्गम भागात आंबापाणी, रुईखेडा, चारमळी, लंगडाआंबा, उसमळी या गावी जाण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात येणार आहेत.
बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून पथकास मत पत्रिकांसह मतदान यंत्राच्या वाटपास सुरवात झाली. कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे लागलीच रवाना झाले़
तालुक्यात नऊ गावे संवेदनशील
चिंचोली, आडगाव, किनगाव, साकळी, दहिगाव, बामणोद, दुसखेडा, भालोद आणि मारूळ ही गावे संवेदनशील असल्याने या गावाकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे़
निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.
मुक्ताईनगर- तालुक्यातील चार जि.प. व आठ पं.स.गणासाठी निवडणूक होत आहे़ बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास मतदान कर्मचारी मतदान यंत्र व साहित्यांसह नेमणुकीच्या मतदान केंद्रावर पोहोचलेत. तालुक्यात एकूण १३४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण सात कर्मचारी अशा स्वरुपात १३४ मतदान केंद्रावर ९३८ कर्मचारी १३ राखीव पथकातील ९१ कर्मचारी आठ झोनल अधिकारी असा ताफा निवडणूक कामी नेमण्यात आला आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास नेमणुकीच्या कर्मचाºयांना मतदान यंत्र व साहित्य वाटप करण्यात आले. यानंतर नऊ एस.टी.बसेस पाच शासकीय वाहने आणि २० खाजगी वाहनांमधून कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुंवर यांनी दिली.