कपाशीच्या बियाणांबाबत शासनाकडून सूचनाच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:32 PM2018-04-26T21:32:24+5:302018-04-26T21:32:24+5:30
कृषी विभाग अनभिज्ञ
जळगाव : जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र असलेल्या कपाशीच्या बियाणांबाबत कृषी विभागाला शासनाकडून अद्याप काहीच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर बीटीच्या पूर्वी बंदी घातलेल्या बियाणांवर यावर्षीही बंदी आहे की नाही? याबाबत देखील कृषी विभाग अनभिज्ञ आहे. दरम्यान गुरूवार, २६ रोजी इतर पिकांच्या बियाणांबाबतची सूचना कृषी विभागाला प्राप्त झाली.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्णात ८ लाख ३४ हजार ४५०हेक्टर क्षेत्र इतका पेरणी लक्षांक ठेवण्यात आला आहे. यामध्ये तृणधान्य १९०५२० हेक्टर, कडधान्य ११३५२० हेक्टर, गळीतधान्य ३५८६० हेक्टर, कापूस ४८३००० हेक्टर, तर ऊस पिकाचे ११५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्षांक आहे. या माध्यमातून जिल्ह्णात १२ लाख २१ हजार ४४७ मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक आहे. याकरीता महाबीजकडून ६०२५ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच कापूस पिकासाठी २३ लाख १६ हजार १४५ पाकिटांची कापूस बियाणांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन कापसाचे नुकसान झाले असले तरीही कापसाच्या क्षेत्रात यंदा घट होणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.
कपाशीच्या बियाणांबाबत अनभिज्ञता
यंदा दुप्पट बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, असा अंदाज आहे. कारण बोंडअळी नष्ट करण्यासाठी योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यातच आता १५ मे पासून पेरणी सुरू होत आहे. काही ठिकाणी तर १ मे पासूनच पेरणी सुरू होते. जेमतेम १५ दिवसांचा, महिनाभराचा कालावधी उरला आहे. मात्र बियाणांची परवानगी अजून दिलेली नाही. भाव ठरवून दिलेला नाही. कोणत्या बियाणांवर बंदी आहे? याची सूचनाही अद्याप दिलेली नाही. मग १५ मे पर्यंत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
६४३० क्विंटलचे आवंटन
अन्य पिकांच्या बियाणांबाबतचे आवंटन कृषी विभागाला गुरूवार, २६ रोजी प्राप्त झाले. सुमारे ६४३० क्विंटल बियाणांचे आवंटन प्राप्त झाले आहे.
३ लाख ४० हजार मे.टन खतांची मागणी
जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर राज्यात सर्वाधिक आहे. मागील वर्षी खरीपासाठी ३ लाख २८ हजार ३२ मेट्रीक टन तर रब्बीसाठी १ लाख १ हजार ४८९ मेट्रीक टन असा ४ लाख २९ हजार ५२१ मेट्रीक टन खताचा वापर झाला होता. २०१८ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ३ लाख ४० हजार मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे. मात्र मंजूर आवंटन अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र जिल्ह्यात खतांचा तुटवडा नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.