खासगीत होतात हजार ते दीड हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:04+5:302021-03-29T04:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील जवळपास खासगी रुग्णालये व खासगी लॅब अशा १५ ठिकाणी कोरोना चाचणी केली जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील जवळपास खासगी रुग्णालये व खासगी लॅब अशा १५ ठिकाणी कोरोना चाचणी केली जात असून दिवसाला साधारण एक हजार ते १५०० पर्यंत या चाचण्या होत आहेत. यात चाचणीचे दर हे ७०० ते ९०० रूपयापर्यंत असल्याने शहरवासीयांचा रोज ९० हजारांचा चाचणीवरच खर्च होत असल्याचे चित्र आहे. शासकीय यंत्रणेत ही चाचणी मोफत उपलब्ध आहे.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन या सेंटरमध्ये कोरोनाची ॲन्टीजन व आरटीपीसीआर या चाचण्या मोफत उपलब्ध आहेत. यासह रेड क्रॉस रक्तपेढीनेही सानेगुरूजी वाचनालयात ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. यासह विविध खासगी रुग्णालये व खासगी लॅबमध्ये या तपासण्या केल्या जात आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना चाचणीसाठी येणार्याची संख्या प्रचंड वाढली आहे. मध्यंतरी अगदी शंभर दीडशेवर गेलेल्या या चाचण्या आता साडेपाचशे पर्यंत पोहोचल्या आहे. यात बाधितांचे प्रमाणही शहरात थेट ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. दिवसें दिवस ही संख्या प्रचंड वाढत आहे. शहरात संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामानाने आता सर्वत्रच चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
५४ हजार चाचण्या आठवड्यात
शासकीय प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आली असून काही अहवाल हे शासकीय यंत्रणेकउून खासगी यंत्रणेकेडेही पाठविले जात असून गेल्या आठवड्यात ५४ हजार ६८४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यात रॅपीड ॲन्टीजन टेस्ट करण्यावर अधिक भर दिला जाता आहे. आरटीपीसीआर चाचण्या सरासरी १५०० रोज केल्या जात आहेत.
असे आहेत दर
शासनाने खासगी प्रयोगशाळांना दर ठरवून दिले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी हे दर कमी अधिक प्रमाणात आकारले जातात. साधारण ७०० ते ९०० या दरम्यान, ॲन्टीजन चाचणीसाठी दर आकारले जात आहेत.
खासगीत आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचे अहवाल हे २४ तासात प्राप्त होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
शासकीय यंत्रणेत तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल मात्र, चार ते पाच दिवसांनी समजत असल्याचे अनेकांनी सांगितले.
दररोज होणाऱ्या चाचण्या
७१४० हजार चाचण्या नियमीत
ॲन्टीजन : ६६०५
आरटीपीसीआर : १५३५
शासकीय प्रयोगशाळेत तपासण्या
सरासरी ९००