‘ई-पास’साठी कारणं दोनच; रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:58+5:302021-05-04T04:07:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई- पास सक्तीचा करण्यात आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई- पास सक्तीचा करण्यात आला आहे. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. ई- पास प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे, त्यात कारणं व त्याबाबतचे पुरावे जोडणे आवश्यक आहे, परंतु ई- पासची प्रक्रिया करताना नागरिक फक्त आधारकार्ड एकमेव जोडत असून इतर कोणताच पुरावा जोडला जात नाही, त्यामुळे ई- पास नाकारला जात आहे.
शासनाने नवीन आदेश काढला त्या दिवसापासून आजपर्यंत ६५०८ जणांनी ऑनलाईन अर्ज केले असून ८७० जणांना ई-पास देण्यात आला आहे. ४०९६ जणांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. १५४२ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. कागदपत्रे पुरेसे व पुरावे जोडले तर एका मिनिटात पास मंजूर केला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या कामासाठी त्यांचे वाचक सिद्धेश्वर आखेगावकर,जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहायक फौजदार नरेंद्र पवार व रवींद्र कापडणे यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने आंतरजिल्हा प्रवेशासाठी ई- पास पद्धत लागू केली असली तरी निम्म्याहून जास्त पासचे अर्ज हे जिल्ह्यातीलच प्रवेशाचे येत आहेत. जिल्ह्यात या पासची गरज नाही. बाहेर देखील विवाह सोहळा, निधन व रुग्ण ने आण साठीच पास मिळणार आहे. यासाठी देखील अर्ज करताना पुरावा जोडावा लागणार असून अर्जदार पुरावेच जोडत नसल्याचे दिसून आले.
आठ दिवसांत किती आले अर्ज? -६५०८
आतापर्यंत दिलेले ई-पास -८७०
प्रलंबित -१५४२
ई-पास साठी मेडिकलचेच कारणं
ई- पास काढण्यासाठी नागरिकांकडून दवाखान्याची कारणे सांगितले जात आहे. ही कारणे देताना त्याबाबत कुठलाच पुरावा जोडला जात नाही. केवळ आधार कार्ड अपलोड केले जाते. त्यामुळे हे अर्ज नामंजूर होतात.
ई-पाससाठी असा करावा अर्ज
ई पाससाठी covid 19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. त्यात अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा आदी माहिती भरायची असून आवश्यक ती कागदपत्रे व अॅंटीजन चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे.
ही कागदपत्रे हवीत
ई- पास हा रक्ताच्या नात्यात लग्न किंवा निधन आणि त्याव्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात ( हायर सेंटर) न्यावयास असलेल्यांनाच दिला जात आहे. यावेळी ऑनलाईन अर्ज करताना मृत्यूचे प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, आधारकार्ड, फोटो, अॅटीजन चाचणी अहवाल आदी कागदपत्रे सादर करावीत.
एका मिनिटात मिळतो ई पास
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे व पुरावा सादर केलेला असेल तर संबंधित व्यक्तीला टोकन क्रमांक मिळतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका मिनिटात पास मंजूर होतो. टोकन क्रमांकावरच पास डाऊनलोड करता येतो. या सर्व प्रक्रियेला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर पास मंजूर केला जातो. यासाठी अर्जदाराला कुठेही जायची गरज नाही, घरबसल्या मोबाईलवर ही प्रक्रिया करता येते.