‘पैसा’ झाला मोठा...हंगाम झाला ‘छोटा’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:18 PM2024-08-30T15:18:42+5:302024-08-30T15:20:20+5:30
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा ‘पैसा’ या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.
कुंदन पाटील
जळगाव : यंदाच्या खरिप हंगामात विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ‘पैसा’ (मिलीपिड्स) या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. ‘पैसा’ खरीप हंगामाच्या जीवावर उठला असताना कृषी संशोधकांनी सुचविलेल्या उपाययोजनांना हाती घेत शेतकरी या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यात रात्रभरासाठी शिवारातच व्यस्त झाला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा ‘पैसा’ या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. ही निशाचर कीड संपर्कात येणारी रोपटे, बियाणे खाऊन टाकतात. तर रोपांची पाने कुरतूडन दुबार पेरणीची वेळही आणून ठेवतात. सध्या ‘पैसा’ किडीचे प्रमाण वाढल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद उत्पादक हैराण झाले आहेत. ‘पैसा’शी लढण्यासाठी या शेतकऱ्यांना अकोला कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार बहुतांश शेतकरी ‘पैसा’च्या नाईनाटासाठी रात्री उशीरापर्यंत शेतशिवारात थांबून असल्याचे दिसून येत आहे.
काय कराल?
‘पैसा’ हा रात्रीच्या वेळी जास्त सक्रीय होतो. त्यामुळे रात्री पालापाचोळा, वाळलेला, कुजलेला काडीकचरा, गवत गोळा करुन नष्ट करावे. सकाळी या ढिगाऱ्याखाली ‘पैसा’ जमा करुन मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. सायंकाळी पिकांना पाणी दिल्यानंतर ‘पैसा’चा प्रादुर्भाव वाढतो. चांगला पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामुळे ‘पैसा’ नष्ट होतो, असा निष्कर्ष डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील किटननाशक शास्त्र विभागाने नोंदविला आहे.
पेरणीपूर्वी बियाण्याला बिजप्रक्रिया केली असल्यास ‘पैसा’चा प्रादुर्भाव कमी आढळून आला आहे. सततचा पाऊस, सुर्यप्रकाश नव्हता, आद्रर्ता जास्त असल्याने ‘पैसा’ किडीचा चालू हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. तातडीने उपाययोजना हाती घेतल्यास ‘पैसा’ किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.
-डॉ.शरद जाधव, विशेषज्ञ,ममुराबाद (जळगाव) केंद्र, राहुरी कृषी विद्यापीठ.