बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:16 PM2018-07-16T14:16:17+5:302018-07-16T14:18:10+5:30
कोणावर अन्याय करण्याचा हेतू नव्हता. बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले.
जळगाव : कोणावर अन्याय करण्याचा हेतू नव्हता. बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले. जुन्या गावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरात श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात केली.
प्रभाग क्रमांक ३,४,१७ या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात सर्वप्रथम झाली. रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान जयश्रीरामच्या घोषात प्रचार फेरीस सुरुवात झाली.
आमदार सुरेश भोळे व चंदूलाल पटेल, माजी महापौर ललित कोल्हे, वामनराव खडके, कैलास सोनवणे आदींसह उमेदवार मीना धुडकू सपकाळे, दत्तात्रय देवराम कोळी, रंजना भारत सपकाळे, प्रवीण रामदास कोल्हे, चेतन गणेश सनकत, भारती कैलास सोनवणे, चेतना किशोर चौधरी, मुुकुंदा भागवत सोनवणे, मिनाक्षी गोकुळ पाटील, रंजना वानखेडे, सुनील वामनराव खडके, विश्वनाथ खडके उपस्थित होते.
त्यामुळे निधी खर्च होवू शकला नाही- सुरेश भोळे
शहराच्या विकासासाठी मी २५ कोटीचा निधी मिळवला मात्र हा निधी कोणामुळे खर्च होवू शकला नाही, हे जनतेला माहीत आहे,असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले. तसेच हा पैसा केवळ विकासासाठी खर्च करायचा असताना तो इतरत्र वळविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निधी खर्च होवू शकला नाही, अन्यथा आणखी ५० कोटी मिळाले असते असेही आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले.
युती तुटल्याने अर्धा विजय आताच झाला
भाजपाच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांचीही इच्छा नव्हती की युती व्हावी. यामुळे युती तुटल्याचा सर्वांनाच आनंद असून युती तुटल्याने अर्धा विजय आताच झाला, असे प्रतिपादन आमदार भोळे यांनी संकल्प मेळाव्यात केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खडसे हे अनुपस्थित
प्रचाराच्याशुभारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते मात्र हे दोन्ही नेते यावेळी उपस्थित नव्हते.