चांगल्यांचे कौतुक नाही, अन् कामचुकारांना धाक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:02 PM2018-04-29T13:02:31+5:302018-04-29T13:02:31+5:30
हितेंद्र काळुंखे
कौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.
जिल्हा परिषदेत हे खराब चित्र पहायला मिळत आहे. ग्रामसेवकांना दिला जाणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुुरस्कार हा गेल्या तीन वर्षांपासून जाहीर झालेला नाही. यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असतानाही याची दखल घेण्यास संबंधित अधिकारी तयार नाही. ही एक प्रकारे मनमानीच म्हणावी लागेल.
यामुळे ग्रामसेवकांमध्ये निराशाही निर्माण झाली आहे. ग्रामसेवक हा ग्रामीण भागातील विकासाच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे. यापैकी काही ग्रामसेवक हे भ्रष्टाचार, गैरकारभार, अकार्यक्षमता आदीमुळे विकासाऐवजी गाव भकास करण्याचे काम करत असताना काही ग्रामसेवक हे खरोखर चांगले काम करणारेही आहेत. अशा ग्रामसेवकांच्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. यासाठी ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ सारखी योजना असतानाही ही योजनाच जळगाव जिल्हा परिषदेने गुंडाळल्यासारखी स्थिती आहे.
याबाबत ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांच्याकडे हा प्रश्न केला असता डिसेंबर १७ च्या आत तिन्ही वर्षाचे पुरस्कार जाहीर केले जातील असे जाहीर केले होते. परंतु डिसेंबर उलटून साडेतीन महिने झाले तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान गेल्या सर्वसाधारण सभेतही हा प्रश्न उपस्थित झाला असतानाही बोटे यांनी लवकरच पुरस्कार जाहीर करु, असे सांगितले परंतु महिना उलटला तरीही काहीच हालचाल झालेली दिसत नाही.
एकीकडे चांगल्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन दिले जात नसताना दुसरीकडे कामचुकार आणि भ्रष्ट ग्रामसेवकांवर कारवाईसाठीही सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. तरीही न्याय मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. अशा ग्रामसेवकांवरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र चांगल्यांचे कौतुक होत नाही, अन् कामचुकारांनाही धाक राहिला नाही...अशी स्थिती निर्माण झाली आहे, असेच एकूण स्थितीबद्दल म्हणात येईल. यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.