जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणीची व्यवस्था नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:53+5:302021-04-22T04:16:53+5:30
बेजबाबदारपणा : जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवत रेल्वेने हात झटकले जळगाव : कोरोना संसर्गाची दिवसेंदिवस होणारी भयावह परिस्थिती ...
बेजबाबदारपणा : जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवत रेल्वेने हात झटकले
जळगाव : कोरोना संसर्गाची दिवसेंदिवस होणारी भयावह परिस्थिती लक्षात घेता, बसस्थानकानंतर रेल्वे स्टेशनवरही परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री तातडीचे आदेश काढले. मात्र, या आदेशानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत स्टेशनवर कुठलीही यंत्रणा दिसून आली नाही. या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवित दुर्लक्ष केले आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी, कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी रात्री केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची जळगाव रेल्वे स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणी करण्याचे आदेश काढले. रेल्वे स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणीची यंत्रणा रेल्वे प्रशासन व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे एकमेकांच्या समन्वयातून उभारून योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, रेल्वे प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनात कुठलाही समन्वय न झाला असल्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत जळगाव रेल्वे स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणी करण्याची कुठलीही यंत्रणा दिसून आली नाही. त्यामुळे बुधवारी दिवसभरात केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड रेल्वेने आलेले प्रवाशी ॲन्टिजेन चाचणीविनाच घराकडे जाताना दिसून आले. त्यामुळे या प्रवाशांमुळे शहरात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इन्फो :
....तर तिकीट निरीक्षकांचेही बेजबाबदार उत्तर
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच स्टेशनमध्ये सोडण्यात येत आहे. मात्र, ॲन्टिजेन चाचणीबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीही व्यवस्था स्टेशनवर करण्यात आलेली नाही. या बद्दल तिकीट तपासणी करणाऱ्या दोन तिकीट निरीक्षकांना ''लोकमत'' प्रतिनिधीने ॲन्टिजेन चाचणीबाबत विचारले असता, त्यातील एका तिकीट निरीक्षकाने रेल्वेतर्फे कुठलीही यंत्रणा नियुक्त करण्यात आलेली नाही. ते आमचे काम नाही. या ठिकाणी सर्व काही ''ऑल इज वेल'' असल्याचे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली.
एकीकडे रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे रेल्वेचे हे तिकीट निरीक्षक रेल्वे प्रशासनाकडून कोरोनाच्या कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ते रेल्वेचे काम नसल्याचे सांगत बेजबाबदार उत्तर देत असल्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तिकीट निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
रेल्वे स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणी केंद्र सुरू करण्याबाबत मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. बुधवारी ही यंत्रणा उभारण्याबाबत मनपातर्फे तयारी सुरू होती. गुरुवारी मात्र सकाळपासून स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणीची प्रकिया सुरू होईल.
-नरवीर रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
इन्फो
जळगाव रेल्वे स्टेशनवर ॲन्टिजेन चाचणी केंद्र सुरू करण्याबाबत मंगळवारी रात्री आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हे केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, त्यांनी गुरुवारी सकाळपर्यंत ॲन्टिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
-युवराज पाटील, सिनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग