रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही बाधित मालमत्तांचे मूल्यांकन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:43+5:302021-02-06T04:28:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नागरिकांसह चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाकडून येणाऱ्या नागरिकांना सोईचा होऊ शकतो ...

There is no assessment of the affected properties even after the notice of the railway authorities | रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही बाधित मालमत्तांचे मूल्यांकन नाही

रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही बाधित मालमत्तांचे मूल्यांकन नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नागरिकांसह चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाकडून येणाऱ्या नागरिकांना सोईचा होऊ शकतो अशा पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होऊ शकलेले नाही. आधी निधीसाठी नंतर भोईटेनगरातून येणाऱ्या आर्मसाठी आणि आता आर्मसाठी बाधित होणाऱ्या मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी हे काम रखडले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात महारेलचे महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक विकास दत्ता यांनी पाहणी करून, मनपा प्रशासनाला आर्ममुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाकडून अद्यापही मूल्यांकनाचे काम सुरू झालेले नाही.

शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांसाठी ठरणाऱ्या अडथळ्यांबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने अनेक विकासकामांचा वेग हा अतिशय संथ आहे. यामुळे शहरात सुरू असलेली विकासकामे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना दूध फेडरेशनकडील रेल्वेगेटकडून यावे लागत आहे. मात्र, अनेकदा हे गेट बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाप्रमाणेच शहरवासीयांसाठी फायद्याचा ठरणारा पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्ष झाले असतानाही हे काम सुरू होऊ शकलेले नाही. पुलालगत आर्म असावा की नसावा यावर निर्णय घेण्यासाठी मनपा प्रशासनाने तब्बल दीड वर्षापेक्षा अधिकचा काळ खर्ची घातला. तर आता आर्मचा निर्णय झाला असताना आर्ममुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठीही मनपा प्रशासन किती महिने खर्ची घालणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मनपा प्रशासनाने याबाबतीत तरी तत्परता दाखवून कामाला लवकर सुरुवात कशी होईल, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: There is no assessment of the affected properties even after the notice of the railway authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.