लक्ष्य नसल्याने खेळाडू सैरभैर, लक्ष फक्त तंदुरुस्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:35+5:302021-05-29T04:13:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे आता खेळाडू घरीच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे आता खेळाडू घरीच जमेल तेवढा व्यायाम करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहेत. मात्र, स्पर्धांचे लक्ष्य नसल्याने खेळाडू सैरभैर झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांत खेळाडू मैदानात जाऊ शकलेले नाहीत.
जिल्ह्यात हॉकी, फुटबॉल, सॉफ्टबॉल, ॲथलेटिक्स यासारख्या खेळांमध्ये मैदान गाजवलेले अनेक खेळाडू आहेत. अनेकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मात्र, गेल्या एप्रिलपासून हे सर्व खेळाडू घरीच आहेत. त्यामुळे अनेक खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. दररोज मैदानावर घाम गाळायची सवय असलेल्या खेळाडूंना घरात बसून राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे खेळाडू आता घरीच सराव करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मैदानात किंवा इनडोअर स्टेडिअममध्ये न जाता आल्याने खेळाडूंनी तंदुरुस्त राहण्यासाठी घरीच विविध व्यायाम करण्याचा पर्याय निवडला आहे.
सॉफ्टबॉलचे बहुतेक खेळाडू घरीच असलेल्या जीम सेटवर व्यायाम करत आहेत, तसेच त्यात पुलअप्स, पुशअप्स, जागेवर धावणे, सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामाचा समावेश होतो. अनेक जण सायकलिंगदेखील करत होते. मात्र, आता नियम कडक झाल्याने अनेकांना सायकलिंग करता येत नाही.
जळगाव जिल्ह्यात सॉफ्टबॉलचे १५ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केली आहे, तर १०० च्यावर राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी राज्य संघाकडून चांगली कामगिरी केली आहे.
ॲथलेटिक्समध्येदेखील ६० राष्ट्रीय खेळाडू आहेत. तेदेखील सध्या घरीच सराव करत करत आहेत.
ग्रामीण भागात शेतांमध्ये होतोय सराव
ॲथलेटिक्सचे अनेक खेळाडू हे ग्रामीण भागातून येतात. त्यात बहुतांश खेळाडू हे चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागातून येतात. हे खेळाडू मैदान उपलब्ध नसल्याने शेतांमध्ये सराव करत आहेत. त्यासाठी बांबू, मोठी झाडे, लाकडी ओंडके यांचा वापर हे खेळाडू करत आहेत.
ऑनलाइन सेमिनारच्या माध्यमातून खेळाडूंशी संपर्क
शहरी भागात राहणारे प्रशिक्षक आपल्या खेळाडूंशी ऑनलाइन सेमिनारच्या माध्यमातून संपर्कात राहत आहेत. त्यांना योग्य ती मदत करत आहेत. त्यांचे सरावाचे व्हिडिओ पाहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत, तसेच मानसिक स्वास्थ्य कायम राहावे, यासाठी विविध तज्ज्ञांची मदत घेतली जाते. खेळाडूंशी संवाद साधला जातो.
कोट -
गेल्या १४ महिन्यांपासून खेळाडू मैदानावर पुरेसा सराव करू शकलेले नाहीत. ते फक्त घरीच दररोज सकाळी आणि सायंकाळी व्यायम करत आहेत. एप्रिल २०२० पासून एकही नवीन स्पर्धा झालेली नाही. सॉफ्टबॉल हा मैदानी खेळ असल्याने त्याचा सराव बंदिस्त जागेत होऊ शकत नाही. खेळाडूंना किमान सरावासाठी तरी लवकर मुभा मिळावी.
-डॉ. प्रदीप तळवलेकर, सचिव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन
कोट -
गेल्या एप्रिल महिन्यापासून खेळाडू मैदानावर सरावासाठी येऊ शकलेले नाहीत. तरी ग्रामीण भागात अनेक खेळाडू आपापल्या परीने सराव करत आहेत. ते तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज सराव करतात. प्रशिक्षकदेखील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-राजेश जाधव, सचिव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन