गरम होत असल्याने तिने घागरा काढून ठेवला; जळगावच्या वसतिगृहात गैरकृत्य नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:10 AM2021-03-05T06:10:02+5:302021-03-05T06:10:21+5:30
गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती; महिला अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जळगाव येथील महिला वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.
गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, जळगावातील कथित घटनेसंदर्भात विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तो तर सांस्कृतिक कार्यक्रम
वसतिगृहातील महिलांनी सांंस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. गाणी, कविता वाचन असा तो कार्यक्रम होता. एक महिला घागरा घालून नाचत होती. मात्र, गरम होत असल्याने तिने घागरा काढून ठेवला, असे चौकशीतून समोर आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
बदनामी नको
n शासकीय वसतिगृहात पीडित आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारित करणे योग्य नाही.
n जळगावातील आशादीप वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते. ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, असे या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले.