मुक्ताईनगरातून तंटामुक्ती गाव मोहिमेसाठी दुसऱ्या वर्षीही प्रस्ताव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:30 PM2018-08-25T23:30:20+5:302018-08-25T23:33:03+5:30
मुक्ताईनगर तालुक्यात सुरूवातीच्या काळात उत्साह दाखविलेल्या तंटामुक्ती गाव अभियानाचा गेल्या दोन वर्षात बोजवारा उडाला असून सलग दोन वर्षापासून या मोहिमेसाठी प्रस्ताव दाखल झालेला नाही.
मुक्ताईनगर, जि. जळगाव : शासन स्तरावर गांभीर्य कमी झाले की अंमलबजावणी अभावी एखाद्या लोकप्रिय व लोकाभिमुख योजना वजा उपक्रमाचा कसा बोजवारा उडतो याचे वर्तमान स्थितीत ‘महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम’ हे उत्कृष्ट उदाहरण होय. ज्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा रंगायची, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभायचा आत्ता त्याच मोहिमेत सहभागी होण्यास वारंवार आवाहन करूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
गेल्या वर्षी एकही गाव या मोहिमेत सहभागी झाले नव्हते तर या वर्षी सहभागी होण्यासाठी अवघे ५ दिवस मुदत उरली असताना एकही प्रस्ताव तालुक्यातून आलेला नाही. एकंदरीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान गुंडाळले गेले तर नाहीना अशी उपहासात्मक टीका होत आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे यंदा बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु झाले आहे. सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे अपेक्षित आहे. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन झाल्याचा दावा होत आहे असे असतांना एकाही ग्रामपंचायतीने मोहिमेत सहभागी होण्याबाबत संपर्क साधला नाही किंबहुना प्रस्तावही सादर केलेला नाही. यामुळे एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या या सलोख्याच्या शासन उपक्रमाकडे पाठ फिरवली गेल्याचे चित्र आहे .
२०१८- १९ या वर्षातील तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजाला १५ आॅगस्टपासून सुरूवात झाली आहे. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितींना आपले अध्यक्ष, सदस्य बदलावयाचे असल्यास त्यांनी याच कालावधीमध्ये हा बदल करावा, अशा सूचना पोलीस विभागाने दिल्या आहे. एक तृतीयांशपेक्षा जास्त समिती सदस्य बदलू नयेत. मोहिमेमध्ये सहभाग घेतल्याबाबतचा ठराव व समितीचे अध्यक्ष, सदस्य यांचे नावाची यादी संबंधीत पोलीस स्टेशनला १ सप्टेंबरपूर्वी सादर करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी केले होते. यास तालुक्यातून अद्याप तरी प्रतिसाद लाभलेला नाही.
आतापर्यंत ६ गावांना पुरस्कार
तालुक्यातील हिवरा, मेंढोळदे, राजुरा धामणदे, वायला आणि भोटा या गावांना यापूर्वी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे.