कोरम नसल्याने सभा तहकूब करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:52+5:302021-04-20T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आम्ही सभा त्याग केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा सदस्यांच्या उपस्थितीत सभा सुरू होती. याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आम्ही सभा त्याग केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा सदस्यांच्या उपस्थितीत सभा सुरू होती. याचा अर्थ कोरम पूर्ण नव्हता, म्हणून ही सभा तहकूब करावी, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी केली असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषेदला कोमात घातल्याचा आरोप विरोधकांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.
यंदाच्या अर्थसंकल्पात दुरस्त्या, सभा, भत्ते यावर साडेचार कोटींची तरतूद असून आरोग्यावर केवळ ४१ लाख निधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नसून गेल्या चार वर्षांपासून सीईओ डॉ. बी. एन. पाटील सोडले तर एकही अधिकारी पदाधिकारी हे सदस्यांना उत्तरे देत नाहीत, सेस फंड घटला कसा, वसूली का होत नाही, याबाबत कोणीच बोलत नाही, असे म्हणून या जिल्हा परिषदेच्या वैभवालाच सत्ताधाऱ्यांनी कलंक लावल्याचा गंभीर आरोप शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे गटनेते प्रभाकर सोनवणे, सदस्य रवींद्र पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. बैठकीचे सर्व ऑनलाईन रेकॉर्ड मागून त्यानुसार नंतर न्यायालयातही जावू असे विरोधकांनी म्हटले आहे.
कोट
सर्व विरोधी गटनेत्यांना आम्ही अर्थसंकल्पाच्या सभेच्या आधीच अर्थसंकल्प दाखविला होता. त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यांनी तेव्हा काही दुरूस्त्या सांगितल्या नव्हत्या, दुरूस्त्या आम्हालाही मान्य आहेत, शिवाय अधिकारीही त्या करायला तयार आहेत. तेव्हा अशा प्रकारे सभात्याग करणे योग्य नाही, सद्या कोरोनाची परिस्थिती असल्याने अनेक अधिकारी कर्मचारी घरी असल्याने कामाच्या अडचणी आहेत. हे विरोधकांनी समजून घेणे अपेक्षित होते. सभेत कोरम पूर्ण होता. - रंजना पाटील, अध्यक्षा
विरोधकांनी सभात्याग करण्याआधी कोरम तपासायला हवा होता. त्यांनी तासभर सभेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर सभात्याग केला. त्यामुळे कोरमचा विषयच येत नाही. शिवाय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, ही सर्वांची भूमिका होती. मात्र, सभा तीन महिन्यांनीच होते. अन्य विषय घेणेही महत्त्वाचे होते. त्याला सभात्याग हा पर्याय नव्हता, विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून आली आहे. - लालचंद पाटील, उपाध्यक्ष जि. प.