इंधनाच्या दराकडे लक्षच नसल्याने आवाज उठेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:18 PM2018-09-29T22:18:54+5:302018-09-29T22:19:12+5:30
विजयकुमार सैतवाल
दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वांचे गणित विस्कटत असले तरी त्याबाबत आवाज उठविला जात नसल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. याला कारण ठरते ते लीटरप्रमाणे इंधन न भरता सरसकट रकमेप्रमाणे इंधन भरणे. त्यामुळे इंधनाचे दर कुठपर्यंत पोहचले याकडे सहजासहजी लक्ष दिले जात नाही व त्याबाबत कोणी बोलत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर वाढण्यासह भारतीय रुपयातील घसरण यामुळे भारतात इंधनाचे दर सातत्याने वाढत असून आता पेट्रोल ९१.५० रुपये प्रती लीटर झाले आहे.
दररोज आठ पैसे ते ८० पैसे या प्रमाणे वाढ होत जाऊन दोन महिन्यात पेट्रोलचे दर ६.८२ रुपये व डिझेलचे दर जवळपास आठ रुपये प्रती लीटरने वाढले आहे. रुपयाच्या घसरणीमुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी सरकारकडून उपाययोजना होत नसल्याच्या आरोप होण्यासह सामान्यांचे कंबरडे यामुळे मोडले जात आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी आॅगस्ट महिन्यात भारतामध्ये इंधनाचे दर वाढत गेले. आता त्यात भरात भर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ८०डॉलर प्रती बॅरल झाल्याने दरवाढीस मदत होत आहे.
दररोज इंधनाच्या दर बदलाच्या निर्णयात तर आॅगस्ट महिन्यापासून दरवाढ सातत्याने सुरू आहे. या बाबत इंधन विक्रेत्यांकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची मोठी घसरण होत असल्याने भारतात इंधन दरवाढ कायम आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण होऊन डॉलरचा दर तब्बल ७२.१० रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस रुपयांतील या घसरणीमुळे व आता कच्च्या तेलाचेही भाववाढीमुळे इंधनाचे दर वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मध्यंतरी रुपया सावरण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी इंधनाचे दर स्थिर असल्याचेही यात दिसून येते.
मात्र इंधन दरवाढीसाठी जनतेने आवाज उठविणे गरजेचे असल्याचा सूर आहे. ज्या वेळी लीटरप्रमाणे इंधन भरले जाईल, तेव्हा दररोज अथवा आठवडाभरात इंधनाचे दर किती वाढले हे लक्षात येऊ शकते, मात्र वाहनधारक लीटरप्रमाणे इंधन न भरता वाहन घेऊन आले की, ते थेट १०० रुपये, २०० रुपये अथवा ५०० रुपये तसेच १००० रुपये या प्रमाणे रकमेनुसार इंधन भरताना दिसून येतात, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळेच इंधन दरवाढ लक्षात नाही, असे एकूणच स्थिती वरून दिसून येते.