गाळेधारकांच्या प्रश्नावर तोडगा नाही अन् कारवाई ही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:17+5:302021-04-05T04:14:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. गाळेधारकांच्या प्रश्नावर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही. दुसरीकडे गाळेधारकांचे बेमुदत संप सुरूच असून, मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा अल्टिमेटमही आता संपला आहे. याबाबत महापालिका कारवाईही करत नाही आणि दुसरीकडे गाळेधारकांच्या संपाबाबत गाळेधारकांशी कोणतीही चर्चा करत नसल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर होत जात आहे.
महापालिकेच्या मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांची प्रश्न हा गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनही कोणतीही कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे दिसून येत नाही, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी दिलेली बिले ही अवाजवी असल्याने, गाळेधारक बिलांची रक्कम भरण्यास तयार नाही. त्यातून मधला मार्ग काढण्याबाबत मागचे सत्ताधारी किंवा विद्यमान सत्ताधारी हेही कोणतेही प्रयत्न करत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळेधारकांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही बैठकही अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. गाळेधारकांना प्रश्न प्रलंबित होत असल्याने, महापालिकेचा आर्थिक परिस्थितीवरही मोठा परिणाम होत आहे, तर दुसरीकडे गाळेधारकांच्या जीवही भांड्यात पडला आहे.
मनपाकडून केवळ अल्टिमेटमच
महापालिका प्रशासनाने गाळेधारकांनी नुकसान भरपाईची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या, तसेच ही रक्कम लवकर भरण्याच्या सूचना देऊन, रक्कम न भरल्यास गाळे ताब्यात घेण्याबाबतचे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले होते. महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम मिळण्याबाबत अनेक वेळा अल्टिमेटम दिले आहेत. मात्र, महापालिकेलाही कोणतीही ठोस कारवाई करता आलेली नाही. महापालिका आयुक्त महापालिकेची आर्थिक परिस्थिती गाळे प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत सुधारणार नाही, असे सांगतात. मात्र, ही रक्कम वसुलीबाबत कोणतीही कारवाई करायला महापालिका प्रशासन धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
गाळेधारकांनी स्वतः सुरू केली आता लढाई
महापालिकेच्या मुदत संपल्या मार्केटमधील गाळेधारकांनी हा प्रश्न कायमसाठी सुटावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा आपले प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधींकडून हा प्रश्न सुटताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीही फारसे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. गाळेधारकांच्या प्रश्न हा लोकप्रतिनिधींसाठी राजकीय मुद्दा झाला असून, हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यातच राजकीय पदाधिकारी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे आता गाळेधारकांनी आपली लढाई आता स्वतः सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांपासून शहराचे १६ मार्केटमधील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे, या संपाकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही, तसेच महापालिका प्रशासनही या संपाकडे लक्ष देत नाही, तसेच कारवाईही करत नाही. यामुळे हा प्रश्न प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे.