पाचोऱ्यात नवीन भागात फवारणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:12 AM2019-09-18T00:12:14+5:302019-09-18T00:13:46+5:30
पावसाळा अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाही पाचोरा पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाचोरा, जि.जळगाव : पावसाळा अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाही पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉलनी भागात शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊन सुमारे ४० टक्के नागरिक वस्ती असतानाही ह्या वर्षी पालिकेतर्फे डास मछर कीटकनाशक फवारणी एकदाही केली नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाचोरा पालिकेतर्फे दरवर्षी फवारणी केली जाते. कीटक, डास यांचा नायनाट करून आरोग्याची काळजी काही प्रमाणात घेतली जाते. मात्र यंदा एकदाही फवारणी केली नाही. कॉलनी भागात मोठमोठे डबके साचले असून चिखल दलदल आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यामुळे डास किडे, यांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे.
पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही फवारणी केली जात नसल्याने नागरिकांत पालिकेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पालिकेकडे एकच ट्रॅक्टर असून त्यावरच फवारणी पंप जोडला आहे. जुन्या शहरात फवारणी चालू आहे. लवकरच कॉलनीत फवारणी केली जाईल असे सांगितले. नगराध्यक्ष संजय गोहिल यांनीही असेच उत्तर देऊन हात झटकले.
दरम्यान, शहराची लोकसंख्या व विस्तार पहाता फवारणी करणारी यंत्रणा अपूर्णच आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सामान्य नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.