गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 PM2021-02-09T16:11:54+5:302021-02-09T16:14:08+5:30
मंगळवारी दुपारी १२ वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात खान्देशासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरु केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कार्यकारणी किती सदस्यांची आहे. यापेक्षा त्यात सामान्य माणसासाठी काम करणारे किती आहेत. याला महत्व असून ज्यांच्याकडे पक्षाचे काम करण्यासाठी वेळ नाही. त्यांना पदावरुन दूर करा. मनापासून काम करणाऱ्यांना संधी द्या. असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजेरी घेतली. कानपिचक्याही दिल्या. गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून बजावले.
मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांनी येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार मनिष जैन, अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदीप देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब खान, युवती प्रदेशाध्यक्ष सक्सेना सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कैलास सूर्यवंशी, प्रमोद पाटील, कल्पना पाटील, डॉ. संजीव पाटील, उमेश नेमाडे, किसनराव जोर्वेकर, रिता बाविस्कर आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी शहर व तालुका आणि विद्यार्थी, महिला अशा सर्व कार्यकारणी सदस्यांची हजेरीच घेतली. प्रत्येक विभागाच्या तालुका व शहराध्यक्षांना व्यासपिठावर बोलावून किती सदस्य हजर आहेत. त्यांना हातवर करण्यास सांगितले. जे सदस्य अनुस्पस्थित आहेत. त्यांना पदावरुन दूर करुन काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांला पक्षाशी जोडा, असे सांगितले. सूत्रसंचालन दिनेश पाटील व रामचंद्र जाधव यांनी केले.
पराभवाचा संघटनात्मक पातळीवर विचार करा...
चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. धनशक्ती किंवा जनशक्ती असे ठोकताळे बांधण्यापेक्षा संघटनात्मक पातळीवर विचार करा. पक्ष संघटना मजबूत करण्यावर काम करा. जनता - जनार्दन योग्य निर्णय घेईल. आत्तापासून कामाला लागल्यास २०२४च्या निवडणुकीत यश मिळेलच, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
नाथाभाऊंनी वेळ घेतला, मीही संयम ठेवला
एकनाथ खडसे यांनी या परिसरात मोठे काम केले आहे. त्यांनी जो पक्ष वाढवला. तो सोडून देणे त्यांना मानवत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीत येण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा अवधी घेतला. आमचेही प्रयत्न सुरुच होते. अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मीदेखील संयम ठेवला. असे सांगत जयंत पाटील यांनी 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा..' अशी मिश्किलीही केली. जिल्ह्यात पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. त्यामुळे २०२४च्या विजयासाठी आजच संकल्प करा. असे आवाहनही त्यांनी केले.
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या !
यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनाही बोलते केले. कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या. पक्षात पुढे पुढे करणाऱ्यांना संधी मिळते. काम करणारा निष्ठावान मागेच राहतो. चमकोगिरी करणारे पुढे येतात. सामान्य माणसात मिसळणाऱ्या, त्यांची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी उपलब्ध करुन द्यावी. अशा सुचना केल्या. याची योग्य दखल घेतली जाईल, असे मंत्री पाटील यांनी अश्वस्त केले.