नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:55+5:302021-06-28T04:12:55+5:30
सुशील देवकर नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व ...
सुशील देवकर
नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय उद्रेक
अमृत योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आल्याने व त्यापैकी अनेक रस्त्यांची साधी डागडुजीही न केल्याने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाबाबतच नाराजी वाढत आहे. याबाबत सुरुवातीला मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून दुर्लक्ष झाल्यानेच व लोकांच्या नाराजीची जाणीव असलेल्या नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत महापौर निवडणुकीत सेनेला पाठिंबा दिला आहे. भाजपाने ज्या ठिकाणी अमृत योजनेचे काम झाले आहे, त्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र भाजपाच्या कार्यकाळात केवळ कामांचे ठराव करणे व त्यानंतर पुन्हा त्यात बदल करून सुधारित ठराव करण्याचेच काम झाले. रस्त्यांवर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. खराब रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी सहनशीलता दाखवली. मात्र त्यांच्यात नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता सत्तांतर होऊन मनपात सेनेची सत्ता आली आहे. मात्र सेनेने पुन्हा नवीन ठराव केले. ते मंजूर होऊन काम सुरू होण्याआधीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे पावसाळ्यानंतरच नवीन रस्त्यांचे काम सुरू होईल. दरम्यानच्या काळात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र ते देखील सर्व ठिकाणी झालेले नाही. तसेच मक्तेदारानेही अमृत गटारीचे काम केल्यानंतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी रस्ते खराब अवस्थेत आहेत. तर भुयारी गटार योजनेत मक्तेदाराने काम झाल्यावर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तरतूदच करारात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही रखडले आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल होऊन वाहन चालविणेच काय पायी चालणेही मुश्कील होत असल्याने नाराजी वाढत आहे. त्याचाच परिपाक शनिवारी प्रभाग क्र.१६ मधील घटनेत झाला. अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले. त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरश: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत नाराजी व्यक्त केली. मनपातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या या नाराजीची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी, यापुढे असे अनुचित प्रकार होणार या नाहीत, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करीत नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांची सहनशीलता संपली तर संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.