खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:06+5:302021-04-11T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांची या इंजेक्शनसाठीची भटकंती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांची या इंजेक्शनसाठीची भटकंती अधिकच वाढली आहे. दरम्यान, वॉर रूम आणि प्रशासनाकडून याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असून, काळ्या बाजारात अडीच हजारांना हे इंजेक्शन मिळत आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
काही रुग्णालये थेट रुग्णांच्या नातेवाईकांना तुमच्या जबाबदारीवरच इंजेक्शन उपलब्ध करून द्या, असे सांगत आहेत. शिवाय बाहेर मेडिकलवर हे इंजेक्शन उपलब्ध न करण्याचे फर्मान अन्न व औषध प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहे. मात्र, मेडिकलमध्येही हे इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकांसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. रोज येणारा साठा नेमका जातो कुठे, असा प्रश्न नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
काळ्या बाजारात विक्री
एका नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आमचा रुग्ण एका खासगी रुग्णालयात दाखल आहे. रुग्णाला दाखल करतेवेळी इंजेक्शन उपलब्ध करून देऊ, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता तीन इंजेक्शनची आवश्यकता असल्याने तुम्हीच तुमच्या जबाबदारीवर इंजेक्शन उपलब्ध करा, असे रुग्णालयाकडून सांगितले जात आहे. आम्ही खूप फिरूनही इंजेक्शन मिळाले नाही. अखेर ब्लॅकमध्ये अडीच हजारात हे इंजेक्शन घ्यावे लागल्याचे या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे अखेर हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकले जात असल्याचे समोर आले आहे.
केवळ तीस टक्के पुरवठा
जिल्ह्यात तुटवड्याची परिस्थिती आहे. शनिवारी मागणीच्या केवळ तीस टक्के इंजेक्शनचा पुरवठा झाला. इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती आहे. निकषात बसणाऱ्या रुग्णालयातच हे इंजेक्शन दिले जावे.
- डॉ. अनिल माणिकराव, औषध निरीक्षक