काँग्रेसच्या वाट्याची एकही जागा कमी होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:13 AM2019-07-28T01:13:39+5:302019-07-28T01:14:06+5:30
काँग्रेस कमिटीच्या विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २००४ व २००९मध्ये झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवेळी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जिल्ह्यातील चार जागांपैकी एकही जागा कमी होऊ नये. उलट या वेळी एक जागा वाढवून मागावी, अशी मागणी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
काँग्रेस कमिटीच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व जिल्ह्यांची जिल्हानिहाय बैठक २६ रोजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झाली. त्या वेळी हा सूर उमटला. या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, ए.डी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, योगेंद्रसिंह पाटील, जि.प.चे गटनेते प्रभाकर सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते.
या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिती जाणून घेतली. यामध्ये आघाडी नसताना व आघाडी केल्यानंतर काय स्थिती राहिली याचीही माहिती घेतली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मतेही जाणून घेतली. सोबतच सध्याची स्थिती पाहता खचून न जाता कामाला लागा, असा धीर दिला.
२००४ व २००९मध्ये झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवेळी काँग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यातील रावेर, अमळनेर, जामनेर व जळगाव शहर या जागा आल्या होत्या. आता या निवडणुकीवेळी एक जागा वाढवून मागावी अशी मागणी करण्यात आली. चार पैकी एकही जागा कमी होऊ नये असा आग्रही या वेळी करण्यात आला.