लग्नात वेळेचं बंधन पाळायला हवं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:14 PM2018-05-13T17:14:59+5:302018-05-15T23:07:19+5:30
वेळ संध्याकाळची होती... लग्नाला जायची तयारी करत होतो... बघता बघता साडेसात वाजले होते... लग्नाची वेळ साडेसहाची होती... भारतीय वेळेनुसार लग्न एक-दीड तास उशिरा लागते म्हणून घरातून उशिरा निघालो...मनाची प्रचंड घालमेल सुरू असते. लग्न लागणार तर नाही ना! आपल्या हातून लग्न निसटून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. लग्न मंडपात जाऊन पोहचलो. लग्न एका प्राध्यापकाचं होतं. वेळेनुसार लागेल असं वाटलं होतं. अनेकजण इकडे तिकडे फिरत होते. भेटत होते. लग्नाची वेळ तर होऊन गेली होती. इकडे तिकडे बघत होतो.
एका प्राध्यापकाने आवाज दिला, ‘बसा सर.’ पुढे साहेब आलेले आहेत. त्यांना भेटायचं तर भेटून घ्या. साहेब दोनशे किलोमीटर अंतरावरून आले होते. त्यांच्याजवळ जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तेवढ्यात एक दुसरे साहेब त्यांच्याजवळ येऊन बसले. गप्पा मारत मारत नवरदेवाच्या वरातीचे दृश्य स्क्रीनवर दाखवले. साहेबांनी पाहिले. आता आले वाटते नवरा-नवरी. एक जण म्हणाला, ‘नाही, ते तिकडेच मंदिरावर आहेत.’ हे दृश्य ड्रोनच्या साह्याने दाखवले आहे.
रात्रीचे साडेआठ वाजले होते. मी साहेबांना म्हणालो, जेवण करून घेऊ. साहेब म्हणाले, ‘लग्न लागल्यावर जेऊ.’ मलाही एकट्याला जेवायला जाता येत नव्हते. मीही त्यांच्याजवळ बसलो. अखेर साहेब थकले. म्हणाले, ‘जरा बाहेर फिरून येऊ. पाणी पिऊन येऊ.’ रात्रीचे साडेनऊ वाजले. नवरदेवाची वरात चालू होती. बाहेर येऊन अर्धा तास फिरून मध्ये जाऊन बसलो. नवरा मुलगा वाजत गाजत प्रवेशद्वाराजवळ आला. नवरी आणि नवरीला स्टेजवर यायला अर्धा तास लागला. तोपर्यंत पाहुणे मंडळी ताटकळत बसली होती. वेळेचे भान कुणालाच नाही. दोन्ही मंडळी शिकलेली. पण दुसऱ्यांचा विचार नाही, कदर नाही. आपल्या प्रेमासाठी दूरदूरून माणसे आली आहेत. आपण वेळेनुसार लग्न लावले म्हणजे रात्री जाण्यासाठी त्यांना त्रास नको, ही भावना कुणाच्या चेहºयावर नाही. आपल्या मस्तीतच ही माणसं.
सायंकाळी साडेसहाची वेळ लग्नाची; पण रात्रीचे सव्वादहा वाजले, लग्न अजून लागले नव्हते. नवरा नवरी स्टेजवर आले. बसले. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. सत्कारार्थीचे नावे पुकारली गेली. एक साहेब सोडले तर बाकी सगळे निघून गेली. सामान्य माणसं मात्र तशीच बसून राहिली. खरं तर आपल्याकडे आलेल्या माणसांचा आपण विचारच करत नाहीत. उलट त्यांचे शोषण करतो. लग्नातही वेळ पाळायला हवी. पण हल्ली ती फॅशनच झाली आहे. सुशिक्षितांचाही यामध्ये फार मोठा सहभाग असतो. पण वेळचे महत्त्व लग्नप्रसंगी राहिलेले दिसत नाही. खरं तर प्रत्येक माणसाची कदर करायला हवी. वेळेचे महत्त्व जाणायला हवे, असे मला वाटते. आज आम्ही शिकलो, मोठे झालो, पण वेळेची कदर करायला नाही शिकलो. हल्ली तर अनेकजण लग्न वेळेवर लागत नाही म्हणून जायचे टाळतात. काहीजण जातात, जेवण करतात, नवरा किंवा नवरीच्या मंडळींना भेटतात व निघून येतात. काहीजण घरबसल्या कुणाजवळ तरी मुंदी वाजवायला देतात. असा माणसांचा तºहेवाईकपणा लग्नप्रसंगी बघायला मिळतो. हे वाईट आहे. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते असं म्हणतात. ती मर्यादा आपण सुशिक्षितांनी तरी पाळायला हवी. कुणाच्या लग्नाला जायचं म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो आहे. शिकलेल्यात आणि अडाणी माणसांत काहीच फरक नाही, अशी म्हणण्याची पाळी येणार नाही. नाहीतर हल्ली अडाणी बरे असेच म्हणावे लागत आहे. कारण हल्ली शिकलेले, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मात्र वेळेचं भान पाळताना दिसत नाहीत. हे फार वाईट आहे. तरीही..
‘वेळेसारखं महत्त्व
कशाला नाही
कारण गेलेली वेळ
पुन्हा परत येत नाही’
म्हणून वेळेचं भान सगळ्यांनी पाळायला हवं.
- प्रा.डॉ.सतीश मस्के