एचआयव्ही बाधीतांविषयी अद्यापही भेदभाव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:01 PM2018-12-01T12:01:49+5:302018-12-01T12:02:36+5:30
मुलांना सकस आहार, शिक्षण मिळण्याची अपेक्षा
जळगाव : रुग्ण व समाजात एचआयव्हीबाबत गैरसमज आहे. या आजाराबाबत कुणालाही माहिती समजू नये म्हणून काही रुग्ण उपचारही घेत नाही. परिणामी अनेक रुग्ण या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. एखाद्या रुग्णाची ओळख स्पष्ट झाल्यावर समाजाकडून देण्यात येणारी हीन वागणूक व मानसिक खच्चीकरण होत असल्याने रुग्णांबाबत हा भेदभाव दूर होणे आवश्यक असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. एचआयव्ही बाधीत मुलांमध्ये भेदभाव न करता त्यांना शिक्षण द्यावे तसेच आवश्यक सकस आहारही दिला जावा, असेही आवाहन जागतिक एडस् दिनानिमित्त करण्यात येत आहे.
एचआयव्हीग्रस्तांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी निकषात बदल व्हावा
एचआयव्ही संसर्गित व्यक्ती शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत असून त्यांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र असो वा इतर निकष यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एचआयव्ही बाधीत रुग्ण असून त्यांना शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र योजनांमधील निकषामुळे ते यापासून वंचित राहत आहे. निकषात बदल करावा, जेणेकरून दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्तींना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मानसिक खच्चीकरणामुळे रुग्ण व्यसनाधीन
एखाद्या रुग्णाची ओळख स्पष्ट झाल्यावर समाजाकडून देण्यात येणारी हीन वागणूक व मानसिक खच्चीकरण होत असल्याने रुग्ण व्यसानाधिनतेकडे व आत्महत्यांसारखे पाऊल उचलतात. हे टाळण्यासाठी या रुग्णांबाबत मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामध्ये होत असलेल्या जनजागृती व उपचार पद्धतीयामुळे संख्या घटत असल्याचेही सकारात्मक चित्र आहे.
एचआयव्ही बाधीतांबाबत जनजागृती वाढत असल्याचे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे अद्यापही भेदभाव होताना दिसतो. एचआयव्ही बाधीत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये व त्यांना पुरेसा सकस आहार मिळणे गरजेचे आहे. तसेच योजनांचाही लाभ या रुग्णांना मिळावा.
- अनिता पाटील, अध्यक्षा, पॉझिटिव्ह पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही नेटवर्क आॅफ जळगाव.