शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाई ला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:15+5:302021-05-17T04:14:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा तोंडावर आला असतानादेखील शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या साफसफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही. महापालिकेने ...

There was no time to clean the main nallas in the city | शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाई ला मुहूर्त सापडेना

शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाई ला मुहूर्त सापडेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा तोंडावर आला असतानादेखील शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या साफसफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही. महापालिकेने नाल्यांचा सफाईसाठी निविदा प्रक्रिया राबवली असली तरी अद्यापही ठेकेदाराला कार्यादेश दिले नसल्याने मुख्य नाल्यांच्या साफसफाईला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. दुसरीकडे उपनाल्यांची साफसफाई सुरू असली, तरी या नाल्याची सफाई करून काढण्यात आलेली घाण पुन्हा नाल्या लगतच टाकली जात आहे.

दरवर्षी मान्सूनआधी महापालिकेकडून शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत असते. मात्र यावर्षी महापालिका प्रशासनाची मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे नियोजन काही प्रमाणात कोलमडलेले दिसून येत आहे. उपनाल्यांच्या साफसफाईला वेळेवर सुरुवात झाली मात्र मुख्य नाल्यांच्या सफाईकडे मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात ७ जूननंतर मान्सूनचे आगमन होत असते. त्याआधीच मनपा प्रशासनाने मान्सूनचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र, मनपा प्रशासनाचे मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

पाऊस झाल्यास नाल्यालगतच्या वस्तीमध्ये घुसते पुराचे पाणी

शहरात २३ किमी लांबीचे ५ मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ७० उपनाले आहेत. सफाईची मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येते. मात्र पावसाळा दोन आठवड्यावर असतानादेखील शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईचे काम सुरु झालेले नाही. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नाले तुंबून परिसरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका निमाण झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसामध्येदेखील गेल्या काही वर्षांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना देखील घडल्या आहेत. या घटनांपासून महापालिका प्रशासनाने अद्यापही बोध घेतलेला दिसून येत नाही. महापालिका प्रशासनाने १७ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली असून, ठेकेदार देखील निश्चित करण्यात आले आहेत.मात्र ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आलेले नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

नाल्यावरील अतिक्रमण मोहिमेला '' खो ''

सप्टेंबर २०१४ मध्ये जळगावात अतिवृष्टीने शहारातील नाले व मेहरूण तलावाजवळील रहिवासी भागांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. शहरातील जवळपास २५ टक्के भागात ३ ते ५ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या आपत्कालीन परि‌स्थितीस शहरातील नाल्यांवर असलेली बांधकामे व अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महापालिकेला नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. दरवर्षी मान्सूनपूर्व कामांचे नियोजन होत असतांना नाल्या लगत असलेले अतिक्रमण काढण्याचा सूचना या दिल्या जातात मात्र आतापर्यंत मनपा प्रशासनाने नाल्या लगत असलेल्या अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभगाने नाल्या लगत असलेल्या अतिक्रमणांचे मूल्यांकन देखील केले होते. मात्र मनपा प्रशासनाने अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

शहरातील ८ नाल्यांना विळखा

जळगावात ८ नाले त्यात ५ प्रमुख नाले आहेत. सुमारे २५ क‌ि.मी. लांबीचे हे नाले आहेत. नाल्यांची रुंदी २५ मीटर ते ६० मीटर पर्यंत आहे. या नाल्यांशी बांधकामासाठी केलेल्या छेडखानीम‍ळे पाण्याला वाहून जाण्यास जागा मिळत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. गोपाळ पुरा, मेहरुन, शनिपेठ या भागातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे.

कोट..

काही दिवसांपासून वैयक्तिक कामासाठी मी रजेवर आहे. मात्र सोमवारी महापालिकेत गेल्यानंतर याबाबतची संपूर्ण माहिती देऊ शकतो.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा

Web Title: There was no time to clean the main nallas in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.