रस्त्यावर साचली ठिकठिकाणी डबकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:39+5:302021-07-20T04:12:39+5:30

बोदवड : शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आता पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने तर रस्त्यास डबक्यांचे स्वरूप प्राप्त ...

There were puddles on the road | रस्त्यावर साचली ठिकठिकाणी डबकी

रस्त्यावर साचली ठिकठिकाणी डबकी

Next

बोदवड : शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आता पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने तर रस्त्यास डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांना खूपच त्रास होत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

येथील बोदवड-मुक्ताईनगर हा वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्याची खूपच दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी काम रेंगाळले आहे तसेच पाण्याचा निचराही होत नसल्याने पाऊस पडल्यास अनेक ठिकाणी जणू तळे साचल्यासारखे चित्र दिसते.

गटारीचेही पाणी रस्त्यावर

या रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर येत असल्याची नागरिकांची ओरड आहे. गटारी आहेत; परंतु त्या तुंबत असल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी गटारीचे पाणीही पावसामुळे रस्त्यावर वाहू लागते.

बाजार समितीजवळ होतो तलाव

शहरातून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ मोठा खड्डा पडलेला असून, जणू मोठे तळे साचल्याचे दृश्य या ठिकाणी नजरेस पडते. याच खड्ड्यात दुचाकी व तीन चाकी जवळपास अर्धे बुडून जात असल्याने काही वाहने ही बंद पडत असून, मनस्ताप सहन करावा लागतो.

साखला कॉलनीतील घरांतही शिरते पाणी

हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला असल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागाने अंग झटकले आहे, तर दुसरीकडे शहरातील साखला कॉलनी परिसरामधील रस्ते अत्यंत खड्डेमय झाले असून, गटारीही तुंबल्या असल्याने गटारीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. तर विशेष पंधराव्या वित्त आयोगात नगर पंचायतीने सर्वाधिक खर्च हा गटारी व रस्त्यावर खर्च केला का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

जोरदार पावसामुळे घरासमोरील गटारीचे पाणी अंगणात तसेच बाजूला असलेल्या मंदिरात घुसले. याकडे नगर पंचायत तसेच नगरसेवक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

- तेजस पाटील, रहिवासी, साखला कॉलनी

बोदवड-मुक्ताईनगर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात गेला असून, त्याची देखरेख राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेकडे आहे.

- के. एस. धनके, अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्तर उप विभाग

नगर पंचायतीने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता सतत डबके साचत असलेल्या या परिसरातील पाण्याचा निचरा होईल, यासाठी उपाययोजना करावी.

- कैलास शर्मा, रहिवासी, साखला कॉलनी.

बाजार समितीसमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दूरसंचार विभागाने केबलचे काम हाती घेतल्याने खोदकाम करीत असताना शहराला पाणीपुरवठा करणारी ओडीएची पाइपलाइन त्यांचाकडून फुटली व ते दुरुस्त करून देणार आहेत.

- गोपाळ खेवलकर, नगर पंचायतीचे पाणीपुरवठा मुकादम

मुक्ताईनगर रस्त्यावर बाजार समितीच्या आवाराजवळ पडलेला मोठा खड्डा व तेथे साचलले पाणी. (छाया : गोपाल व्यास)

साखला कॉलनी परिसरात मंदिरापर्यंत पोहोचलेले गटारीचे पाणी.

Web Title: There were puddles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.