राज्यात १८ वर्षे पूर्ण केलेल्यांना मिळणार 'ही' सुविधा

By अमित महाबळ | Published: September 25, 2022 05:48 PM2022-09-25T17:48:36+5:302022-09-25T17:49:26+5:30

राज्यात १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची सर्वांगीण तपासणी होणार आहे. 

There will be a comprehensive test of women above 18 years, mothers, pregnant women in the state | राज्यात १८ वर्षे पूर्ण केलेल्यांना मिळणार 'ही' सुविधा

राज्यात १८ वर्षे पूर्ण केलेल्यांना मिळणार 'ही' सुविधा

Next

जळगाव : राज्यात १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची सर्वांगीण तपासणी दि. २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान केली जाणार आहे. जळगाव शहरात महापालिका दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षांवरील तरुणी, महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करण्यासह प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा देण्यात येणार आहे. 

तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. जळगाव शहरात तपासणीची सुविधा महापालिका दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तपासणी केली जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये डी. बी. जैन रुग्णालय (शिवाजीनगर), चेतनदास मेहता रुग्णालय (सिंधी कॉलनी), नानीबाई अग्रवाल रुग्णालय (पंचमुखी हनुमान मंदिरामागे), मुलतानी रुग्णालय (अक्सानगर, मेहरूण), शाहीर अमर शेख दवाखाना (शनिपेठ), सुरेशदादा जैन प्राथमिक आरोग्य केंद्र (हुडको, पिंप्राळा) यांचा समावेश आहे.

या असतील सुविधा, तपासणी
या अभियानात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महिला व मातांची तपासणी, वजन व उंची घेऊन बीएमआय काढणे, हिमोग्लोबीन, लघवी व रक्तातील साखर तपासणी, गरज असल्यास एक्स-रे, मॅमोग्राफी, कर्करोग, रक्तदाब व मधुमेह (३० वर्षांवरील सर्व महिला) स्क्रिनिंग, माता व बालकांचे लसीकरण, अतिजोखमीच्या मातांची तपासणी, बालकांची तपासणी, रक्तगट तपासणी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार इतर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

हे होणार औषधोपचार
प्रत्येक आजारी महिलेला औषधोपचार, फॉलिक ॲसिड, कॅल्शिअम, आयर्नवाढीची औषधे यासह आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया सुचविण्यात येणार आहेत. तसेच पोषण आहार, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती, बीएमआय १८.५ ते २५ च्या दरम्यान ठेवण्याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.

शासनाने नवरात्रोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील महिलांची सर्वांगीण तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जळगाव शहरातील महापालिका दवाखान्यांमध्ये तपासणी केली जाणार आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जळगाव महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.


 

Web Title: There will be a comprehensive test of women above 18 years, mothers, pregnant women in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.