जप्त कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:24+5:302020-12-12T04:32:24+5:30

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट पतसंस्था (बीएचआर) फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदारांनी जे आरोप केलेले आहेत, त्यानुसार त्याची पडताळणी ...

There will be a forensic audit of the seized documents | जप्त कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

जप्त कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

googlenewsNext

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट पतसंस्था (बीएचआर) फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदारांनी जे आरोप केलेले आहेत, त्यानुसार त्याची पडताळणी आता सुरू झाली असून, कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली कागदपत्रे व इतर पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या विवेक ठाकरे, सुजित वाणी व इतरांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले असून त्यावर १६ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे.

अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांनी संगनमत करुन काही कोटी रुपयांची मालमत्ता कवडीमोल किमतीत विकली असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेली कागदपत्रे तपासून त्यातून खरोखरच आरोपींनी या मालमत्ता किती कमी किमतीला विकल्या. त्यांचा त्यावेळी बाजारभाव काय होता आणि प्रत्यक्षात त्या कितीला विकण्यात आल्या याचा शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोपी कंडारे, विवेक ठाकरे व इतरांनी ठेवीदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे १०० टक्के पैसे परत केले नाहीत. खात्यावर एक रक्कम दाखविण्यात आली व प्रत्यक्षात ठेवीदारांना त्यापेक्षा किती कमी रक्कम देण्यात आली, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक ठेवीदाराचे खाते आणि आरोपींकडून जप्त केलेली कागदपत्रे याचा ताळमेळ लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे आताच्या परिस्थितीवरुन दिसून येते. प्रत्यक्ष ही कागदपत्रे तपासणी सुरू केल्यावर त्यातून आणखी काही माहिती पुढे आल्यावर त्याअनुषंगाने तपास वाढत जाण्याची शक्यता आहे.

कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कसरत

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, मुख्य फिर्यादीमध्ये जे जे आरोप करण्यात आले आहेत. त्याचे सध्या व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. त्यावरुन नेमकी आर्थिक परिस्थिती समजणार आहे. सध्या त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.यातील आरोपींनी ठेवीदारांना शंभर टक्के पैसे परत करण्याचे दाखवून प्रत्यक्षात केवळ ३० टक्के रक्कमच ठेवीदारांना दिली आहे. याबाबत नेमकी परिस्थिती काय? किती ठेवीदारांना कमी रक्कम देण्यात आली, विवेक ठाकरे याने किती जणांची कागदपत्रे स्वत:कडे घेतली. त्यातील किती मूळ कागदपत्रे आहेत. अशा सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम करताना यंत्रणेची कमालीची कसरत होत आहे.

तिघांचा जामिनासाठी अर्ज

या प्रकरणातील ५ जणांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापैकी विवेक ठाकरे, सुजित वाणी यांच्यासह तिघांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रकाश वाणी, अनिल पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना आठवड्यातून दोन दिवस पोलिसांना तपासासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सध्या त्यांच्याकडून कागदपत्रांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कुणाल शहा याचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या सर्व अर्जाची येत्या १६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

Web Title: There will be a forensic audit of the seized documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.