शहरातील सर्व नागरिकांचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:17+5:302021-05-01T04:15:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील काेराेना बाधितांची संख्या वाढतच जात असून, मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काेराेना बाधितांची संख्या वाढतच जात असून, मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा शहरातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. '' माझे कुटुंब माझी जबाबदारी '' या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या मोहिमेसाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी आदेश काढून मनपातील वेगवेगळ्या विभागातील १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील काेराेना बाधितांची संख्या दरराेज १५० पेक्षा जास्त येत आहे. तर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. शहरातील काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी बाधितांचा शाेध घेण्याची माेहिम राबविण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. पहिल्या लाटेत माझे कुटुंब - माझी जबाबदारी या माेहिमेतंर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर तसेच बाधित रूग्ण विलगीकरणामुळे रूग्ण संख्या नियंत्रणात येण्यास मदत झाली हाेती. त्यामुळे काेविडची दुसरी लाट राेखण्यााठी शासनाने पुन्हा एकदा माेहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माेहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बाधितांसह कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली जाणार आहे. या कामासाठी मनपातील लिपीक व शिपाई पदाच्या १०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक प्रभागात नियुक्ती करून पथकांमार्फत सर्वेक्षण पुर्ण करून घेतले जाणार आहे. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांनी आदेश पारीत केले आहेत.
घरोघरी जाऊन केली जाणारी तपासणी
या मोहिमेअंतर्गत महापालिकेकडून शहरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ही मोहीम यशस्वी ठरली होती. यासाठीच महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ही मोहीम आखली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये तपासणी केली जाणार आहे. मनपा वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागातील कर्मचारी देखील या मोहिमेअंतर्गत आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. महिनाभरात ही मोहीम पूर्ण करून जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.