मालमत्ता परस्पर विकत ६२ लाखही लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:21+5:302021-07-04T04:12:21+5:30
भुसावळ : शहरातील मोक्याच्या ठिकाणी श्रीराम मंदिर भागातील मालमत्ता विक्रीच्या बहाण्याने तक्रारदारासह त्यांच्या नातेवाइकांकडून तब्बल ६२ लाख ३ हजार ...
भुसावळ : शहरातील मोक्याच्या ठिकाणी श्रीराम मंदिर भागातील मालमत्ता विक्रीच्या बहाण्याने तक्रारदारासह त्यांच्या नातेवाइकांकडून तब्बल ६२ लाख ३ हजार ६०० रुपये लुबाडत लाखोंची मालमत्ता विक्री केल्याने जळगावच्या तिघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हेमलता जवाहरलाल बंब (वय ६०, रा. शेरे पंजाब सोसायटी, अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी अभय अमृतराव शिंदे, एजंट अक्षय मनोज अग्रवाल, अश्विन चौधरी सर्व रा. जळगाव यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यानुसार वृत्त असे की, तक्रारदार हेमलता बंब यांचे आजोबा मुलतानचंद बंब यांनी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आई चंदाबाई बंब यांच्या नावावर केली होती. प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी एजंट अक्षय अग्रवाल व अन्य या दोघा आरोपींच्या माध्यमातून व्यवहार निश्चित करण्यात आला. मात्र, मालमत्ता विक्रीसाठी वेगवेगळी कारणे सांगत संबंधितांनी १४ मे २०२० ते आजतागायत वेळोवेळी बंब यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांकडून ६२ लाख ३ हजार ६०० रुपये हडपले व अविनाश बाविस्कर व निखिल खडसे यांना मालमत्ता परस्पर विक्री केल्याने तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत हा बाजार पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शेख चांद या आरोपीने इलेक्ट्रॉनिक दुकानातून महागड्या वस्तू खरेदी करून पोबारा केला होता.