ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:25+5:302021-01-22T04:15:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण निर्मूलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जेसीबीव्दारे तोडण्यात आले. हे अनधिकृत बांधकाम तोडताना काही वाद उद्भवू नये म्हणून गुरुवारी पहाटे ५.३० वाजता तगड्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण तोडण्यात आले.
गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले हे अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी स्थानिक नगरसेविका दीपमाला काळे यांनी गेल्या महासभेवेळी मनपाच्या आवारात आंदोलनही केले होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे हे पोलीस फौजफाट्यासह पोहोचले व अवघ्या तासाभरात हे अतिक्रमण जेसीबीव्दारे तोडण्यात आले.
विधीवत प्रार्थना करून काढले अतिक्रमण
सकाळी ५.३० वाजता मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी प्रार्थना केली. त्यानंतर तेथील साहित्य एका बाजूला ठेवण्यात आले. मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. जुने लोखंडी गेटदेखील हटविण्यात आले.
चौकात येणारे सर्व रस्ते केले बंद
अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून या चौकात येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले होते. बुधवारी रात्री ११.३० वाजताच या भागात सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती.
पहाटे ४ वाजल्यापासूनच पोलिसांचा बंदोबस्त
अनधिकृत बांधकाम तोडण्याची वेळ पहाटे ५ वाजताची ठरली होती. गणेश कॉलनी, कोर्ट चौक व आयएमआर महाविद्यालयाकडून येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा ताफा तैनात केला होता. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून दोन दिवस याठिकाणी बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.
पंधरा दिवस चालली खलबतं
हे बांधकाम पाडण्याआधी वाद निर्माण होऊ नये म्हणून मनपा आयुक्त, उपायुक्तांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चा केली. तर महापौर भारती सोनवणे यांनीही ख्वाजामियाॅंच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली. यासह समाजातील काही जाणत्यांसोबत चर्चा करून सर्वांना विश्वासात घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून सर्वप्रकारच्या गोपनीय अहवालांचीदेखील माहिती घेतली. त्यानंतरच हे बांधकाम पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली.
महापौर भारती सोनवणे ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये
महापौर भारती सोनवणे या पहाटे ५ वाजल्यापासून कारवाईच्या ठिकाणी हजर होत्या. तसेच वादाचा विषय लक्षात घेता, महापौरांनी सामंजस्याने हा विषय हाताळला, पोलीस व मनपा प्रशासनाला यासाठी १५ दिवसांचा वेळदेखील दिला. महापौर सोनवणे या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये आल्या असून, पाहणी दौरा, सफाई अभियान व आता अतिक्रमण कारवाईमुळे महापौरांची वेगळीच परिणामी आक्रमक छबी पाहायला मिळत आहे.
रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश
महापौर भारती सोनवणे व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी तत्काळ बांधकाम अभियंत्यांना अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणचा रस्ता दुरुस्त करण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर सकाळी ९ वाजताच सर्व जागा साफ करून, खडी व डांबराव्दारे या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आली.
कोट..
याठिकाणी कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ राहिले असते तरी याठिकाणी कारवाई करण्याची आम्ही मागणी केली असतीच. वाहनांची संख्या वाढत आहे तसेच हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. अनेकदा या अतिक्रमणामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच हा विषय लावून धरला व अखेर मनपा प्रशासनाने कारवाई केली.
- दीपमाला काळे, नगरसेविका