जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास
By सागर दुबे | Published: April 12, 2023 02:40 PM2023-04-12T14:40:48+5:302023-04-12T14:41:22+5:30
वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडविली
जळगाव : जळगाव शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून शिवाजीनगर, स्टेट बँक कॉलनी आणि नशेमन कॉलनीतील बंद घरांमध्ये डल्ला मारून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडाली असून याप्रकरणी रामानंदनगर, शहर आणि एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चाचणी विभागातील कार्यकारी अभियंता प्रदीप आबाजी सोरटे हे स्टेट बँक कॉलनी येथील लोटन शिंपी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. ५ एप्रिल रोजी सोरटे कुटूंबिय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा ऐवज चोरून नेला. रविवार, दि. ९ एप्रिल रोजी घरमालक शिंपी यांना सोरटे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यांना घरात जावून पाहिल्यानंतर चोरी झाल्याची घटना समोर आली. त्यांनी सोरटे कुटूंबियांना संपर्क साधून त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याची माहिती दिली.
दुस-या दिवशी सोमवारी सोरटे कुटूंबियांनी घर गाठले. त्यावेळी त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तर ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानातले, १० हजार रूपये किंमतीचे चांदीचे सामान, १० किंमतीचे चांदीचे कडे, १ हजार २०० रूपयांचे चांदीचे शिक्के, १५ हजार रूपये किंमतीचा टीव्ही, ४ हजार रूपये किंमतीचे चांदीचे मंगळसूत्र, १० हजार रूपये किंमतीचे घड्याळ असा एकूण ८५ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. अखेर प्रदीप सोरटे यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कौन है...कौन है...म्हणताच पळाला चोरटा
शिवाजीनगर येथे प्रेमलता विनोद तिवारी या पती, मुलगा व मुलीसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती एमआयडीसीतील बीएचआर संस्था येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. सोमवारी ते रात्री ड्युटीला गेले होते. जेवणानंतर प्रेमलता तिवारी यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी लागत नसल्यामुळे दोरीने दरवाजा बंद केला होता होता. मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास खोली मधला अचानक लाईट सुरू झाल्यामुळे प्रेमलता यांना जाग आली. ड्युटीहून पती घरी आले असावे, म्हणून त्यांनी आजू-बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दरवाजा उघडा दिसला आणि बाहेर एक व्यक्ती दिसून आला. कौन है...कौन है..असे आवाज दिल्यानंतर तो व्यक्ती तेथून पळून गेला. दरम्यान, प्रेमलता यांना घरातील २ मोबाईल आणि पगाराचे १५ हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याची खात्री त्यांना झाली. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात
नशेमन कॉलनी येथे हिसाहक इब्राहीम रंगरेज हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी दुपारी डल्ला मारला. घरातून १५ हजार रूपयांची रोकड आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.