जळगावात चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:21 PM2018-09-10T15:21:42+5:302018-09-10T15:23:41+5:30
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली.
जळगाव : पोळा सणानिमित्त गाढोदा (ता.जळगाव) येथे मूळ गावी गेलेले दिनकर गोरख पाटील (वय ४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली. दिनकर पाटील हे बाहेती विद्यालयात शिक्षक आहेत.
शिव कॉलनीतील गट क्र.५४ मध्ये आनंद उद्योगजवळ दिनकर पाटील हे पत्नी रेखा, मुलगा यश, मुलगी तेजश्री व यशश्री यांच्यासह वास्तव्याला आहेत.रविवारी पोळा सण असल्याने पाटील कुटुंब शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गाढोदा गेले होते. ही घटना रविवारी सकाळी घराशेजारी राहणारे डी. पी. सरोदे यांच्या लक्षात आली.
३४ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब
सोन्याच्या साखळ्या, टोंगल, अंगठी, करदोडा असे ३४ ग्रॅम सोने व ४० भार चांदीचे दागिने गायब झालेले होते. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहकाºयांना घटनास्थळी रवाना केले तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वान गल्लीत घुटमळले तर ठशांचे नमुने घेण्यात आले. दरम्यान,दिनकर पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.
दिनकर पाटील यांच्या शेजारीच राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याकडेही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून चांदीचे दागिने लांबविण्यात आले आहेत. चव्हाण हे पत्नी सुवर्णा यांच्यासह अहमदाबाद, सोमनाथ व पावागड येथे देवदर्शनाला गेले आहेत. शनिवारीच ते रवाना झाले आणि रात्री त्यांच्याकडे घरफोडी झाली. चोरट्यांनी नेमके काय लांबविले आहे, हे ते परत आल्यावरच स्पष्ट होईल. चव्हाण हे एस.टी वर्कशॉप येथे नोकरीला आहेत.
घरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरात दिनकर पाटील यांनी शिव कॉलनीतील घर गाठले. मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त होता तर शेवटच्या खोलीत कपाट उघडे होते. चोरट्यांनी प्रत्येक खोलीत सामानाची नासधूस केलेली होती.