कोरोना बाधितांच्या पलंगावर चोरट्यांचा ‘घरसंसार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:18 AM2021-08-15T04:18:51+5:302021-08-15T04:18:51+5:30
जळगाव : महावितरणच्या कर्मचारी क्वार्टरमध्ये सुरु केलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून चक्क साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
जळगाव : महावितरणच्या कर्मचारी क्वार्टरमध्ये सुरु केलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून चक्क साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील महावितरण कंपनीच्या परिमंडळ कार्यालय परिसरात कर्मचारी निवासस्थान आहे. इमारत क्रमांक ७ मधील खोली क्रमांक ३ व ४ मध्ये कोवीड क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. हे सेंटर बंद झाल्यानंतर तेथे चार महिला प्रशिक्षणार्थी वास्तव्यास होत्या. मात्र, २७ जुलै रोजी महिला प्रशिणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही खोलींना कुलूप लावण्यात आले होते. दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी रेस्ट हाऊस सुपरवायझर सुरेश जाधव यांना क्वारंटाईन सेंटरच्या दोन्ही खोलींचे कूलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
पलंग, गाद्या, पंखे, ट्युबलाईट लंपास
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोरे यांनी कनिष्ठ अभियंता यांच्यासह क्वारंटाईन सेंटर गाठले. पाहणी केल्यानंतर २३ हजार ६०० रूपये किंमतीचे चार पलंग, २४ हजार ७८० रूपये किंमतीच्या सहा गाद्या, ११ हजार ८०२ रूपये किंमतीचे सहा पंखे, २ हजार ८९१ रूपये किंमतीच्या सात उशा तसेच २ हजार ७२ रूपये किंमतीचे २ ट्युब लाईट असा एकूण ६५ हजार १४५ रूपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले.
अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसात तक्रार
अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानंतर अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील करित आहेत.