चाळीसगावातील चोरी प्रकरणात चुलत भाऊच निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 08:05 PM2019-03-17T20:05:29+5:302019-03-17T20:07:01+5:30
चाळीसगाव शहरातील चंडिकावाडी येथील चोरीचा अवघ्या २४ तासात छडा लावत पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाला ताब्यात घेऊन मुद्देमालही हस्तगत केला आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : शहरातील चंडिकावाडी येथील चोरीचा अवघ्या २४ तासात छडा लावत पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाला ताब्यात घेऊन मुद्देमालही हस्तगत केला आहे.
चंडिकावाडीत १५ रोजी भरदुपारी अप्पा हरी राठोड हे गावी गेले असता त्यांच्या शेजारीच राहणारा त्यांचा चुलत भाऊ जगन्नाथ उर्फ नरसिंग राठोड (वय ३०) याने कडी-कोंडा तोडून पाच लाख ९० हजार रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने ठैवलेली पेटीच चोरुन नेली होती.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी तपासाची चक्रे फिरवून २४ तासात आरोपीवर झडप घातली. त्याच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. त्याला न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती प्रशांत बच्छाव यांनी पत्रपरिषदेत दिली.
डाव साधला... पण पेटी उघडलीच नाही
जगन्नाथ उर्फ नरसिंग राठोड हा अप्पा हरी राठोड यांचा सख्खा चुलत भाऊ असून, दोघांची घरे शेजारीच आहेत. जगन्नाथ हा किराणा दुकान चालवतो. १५ रोजी अप्पा राठोड गावी गेल्याची संधी साधून जगन्नाथने घराचा कडी-कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटीच चोरुन नेली.
पोलिसांनी संशयित म्हणून जगन्नाथला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने चोरी केल्याचे कबूल करतानाच चोरलेली लोखंडी पेटी आणून दिली. पेटी उघडलेली नव्हती. पोलिसांसमोर ती उघडण्यात आली. त्यावेळी पेटीत मुद्देमाल मिळून आला.