सारासार विचार करा उठाउठी।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:05+5:302021-03-01T04:19:05+5:30
नाम धरा कंठी विठोबाचे.. सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, ...
नाम धरा कंठी विठोबाचे..
सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाचि नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत। भावें गाता गीत विठोबाचे... श्रीमंत श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय ।। या अभंगातून आपल्याला उपदेश करतात, महाराज म्हणतात अहो जन हो...
सार आणि असार यांचा विचार आपण मनुष्यजिवाने लागलीच केला पाहिजे आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमात्म्याचे नाम आपल्या कंठात धरलं पाहिजे. त्यानं काय होईल बरं का, आपल्या जीवनातली सगळी संकटे, बाधा टळून जातील आणि आपण ज्या मायेत अडकलो आहोत, म्हणजे त्या भवसागरातून आपल्याला भगवंत तारून नेईल. एवढा अमूल्य मनुष्य जीव आपल्या भगवंतकृपेने प्राप्त झाला, इतकी सुंदर आपल्याला नामस्मरण करायला वाचा दिली. ते रामनाम आपण रात्रंदिवस घेतलंच पाहिजे. मग असे जर निष्ठेने, अंतःकरण भावाने जर आपण नाम घ्यायला लागलोत, तर आपला उद्धार होईलच, यात शंकाच नाही. पण ज्या कुळात आपण जन्माला आलो, त्या कुळाचा उद्धार भगवंत करतील. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाबा, नामामध्ये सार आहे, त्याच्यात आपलं हित आहे, आपण नाम घेतल्याने आपला उद्धार नक्कीच होणार आहे, असा हा हितकारक विचार त्याच्यात संपूर्ण सार भरलेला आहे... असा विचार मनुष्याने लगेच केला पाहिजे; कारण भगवंताचे नाम ह्या जगात सर्वश्रेष्ठ आहे, श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठ राहील. सध्याची जी कोरोनाची स्थिती आपल्यासमोर आहे, त्यात आपल्याला सिद्ध झालेच आहे की, नाम हे खरं आहे, त्यात सार आहे.
निरूपण : हभप श्री मंगेश महाराज जोशी, जळगाव.