सलग तिसऱ्या दिवशी जळगावातून लांबविली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:31 PM2017-12-15T17:31:49+5:302017-12-15T17:41:09+5:30
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलीस यंत्रणा लागली कामाला
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५ : भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या सुनिता अनिल शर्मा (वय ४२, रा.पारेख नगर, जळगाव) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची मंगलपोत चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता लांबविल्याची घटना रामानंद नगरातील विठ्ठल रुख्माई मंदिराजवळ घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी ही हातसफाई केली. सलग तिसºया दिवशी जळगावातून चोरट्यांनी सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी रात्री सव्वा सात ते आठ या दरम्यान, प्रमिला दिलीप चौधरी (५५ रा. नंदनवन कॉलनी) यांची ६८ हजाराची पावणे तीन तोळ्याची सोनसाखळी गणेश कॉलनी परिसरातून लांबविण्यात आली होती, त्यानंतर भाविका सुमित लोढा (२८ रा.पहूर, ह.मु.अयोध्या नगर) यांची अडीच तोळ्याची सोनसाखळी कासमवाडी रस्त्यावरुन तर ज्योती दत्तात्रय नेमाणे (३६, रा.जळगाव) यांची प्रत्येकी ६० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी शिरसोली रस्त्यावरुन चोरट्यांनी लांबविली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी परिसरातून सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. त्यात एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. गुुरुवारी शिरसोली रस्त्यावर झालेल्या घटनेतही चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.