बोदवड शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 05:29 PM2019-12-16T17:29:45+5:302019-12-16T17:31:09+5:30
बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले असून, यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
बोदवड, जि.जळगाव : बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले असून, यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातून शहरातील भुसावळ चौफुली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक, मलकापूर चौक, चौफुली गांधी चौक, सुराणा निवास परिसर, होळी मैदान, बारा भाई गल्ली, बारभाई वाडा, जामठी दरवाजा, म्हसोबा मंदिर, नगर पंचायत कार्यालयवजवळ व आणखी गरज असेल त्याठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यातील गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक याठिकाणी बसविण्यात आले आहेत. याचे डिस्प्ले व देखरेख नगरपंचायत कार्यालय व बोदवड पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहेत. यातून समस्त शहरावर आता सीसीटीव्हीचा तिसरा डोळा नजर ठेवणार आहे. यामुळे शाळा कॉलेज परिसरात टवाळखोरवरही वचक बसणार व गुन्हेगारीला आळा लावण्यास पोलीस प्रशासनाला मदतही होणार आहे. यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर आणखी कॅमेरे हे महाविद्यालय परिसराजवळ लावण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायत कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी दिली.