भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 06:20 PM2021-01-18T18:20:43+5:302021-01-18T18:21:15+5:30
प्रशासनाने अर्ज ठरविला होता बाद : न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मतदारराजानेही दिला विजयाचा कौल
जळगाव : सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून इतर म्हणून उमेदवारी अर्ज नाकारलेल्या व नंतर न्यायालयीन लढ्यात उमेदवारी मिळालेल्या भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांचा १७४ मतांनी पराभव केला.
भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांनी महिला राखीवमधून अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी ह्यलिंगह्ण प्रकारापुढे ह्यइतरह्ण असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली व त्यांना स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागात जोमाने प्रचार केला व यात त्यांना अखेर यश मिळाले.
१५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर अनेक जण विजयाचे दावे करीत होते. मात्र अंजली यांनी शांत राहत निकालाची प्रतीक्षा केली व सोमवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी ठरल्या. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीय लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. अंजली पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्या वेळी त्यांचा केवळ ११ मतांनी पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी तब्बल ५४८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांना ३७४ मते मिळाली.
जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आले. आता गावातील समस्या माझ्या जबाबदारीने मी सोडविणार असून माझ्या उमेदवारीवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन.
- अंजली पाटील, विजयी तृतीय पंथीय उमेदवार.