क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:38 PM2020-08-10T12:38:22+5:302020-08-10T12:38:34+5:30
नळ तुटला, पाण्याची गळती : स्वच्छता कर्मचारी सुरक्षेविना, दरवाजेही तुटलेले
जळगाव : शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील क्वारंटाईन सेंटरमधील असुविधांबाबत अनेकवेळा ओरड झाली असताना पुन्हा एकदा या ठिकाणच्या अस्वच्छता दर्शविणारे फोटो व व्हिडीओ समोर आले आहे़त़ स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे व तुटलेले नळ व पाण्याची होणारी गळती यात दिसत असून अशा परिस्थितीत संशयितांना या ठिकाणी राहावे लागत असल्याचे चित्र आहे़
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर असून यासाठी तीन इमारती आहेत तर रुग्णांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहे़ या दोन्ही सेंटरमधील स्वच्छतेचा मुद्दा वारंवार समोर आलेला आहे़ यासह जेवणाच्या बाबतीत तक्रारी कायमच होत असतात़ त्यातच काही दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापती व नगरसेवकांनी भेट देऊन या ठिकाणच्या यंत्रणेचे वाभाडे काढले होते़ स्वच्छता नसल्याचे खुद्द त्यांच्या पाहणीत समोर आले होते़ त्यांनी त्याबाबत जाबही विचारला होता़ त्यातच आता क्वारंटाईन सेंटरमधील काही छायाचित्रे समोर आली आहेत़ त्यात काही सामान अडगळीत पडला असून अस्वच्छता झाली आहे़ बाथरूममधील नळांमधून पाणी थेट जमिनीवर येत असून या ठिकाणी स्वच्छता नसल्याचे चित्र आहे़
अॅन्टीजन टेस्ट होत असल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना राहावे लागत नाही, अगदी कमी संशयित रुग्णांना या ठिकाणी थांबावे लागते, असा दावा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी केला व आधीपेक्षा परिस्थिती वेगळी असल्याचेही त्यांनी डॉक्टर्सच्या बैठकीत सांगितले होते़ मात्र, वास्तव वेगळेच असल्याचे व्हिडिओ व छायाचित्रांमधून समोर येत आहे़