किनगावातील खड्ड्यांचे फोटो केले पालकमंत्र्यांना टिष्ट्वट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:26 PM2018-09-04T17:26:51+5:302018-09-04T17:27:07+5:30
मोटारसायकलने दौरा करून रस्त्यांची पाहणी करण्याचे कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना दिले प्रती आव्हान
यावल, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव ते यावल दरम्यान असलेल्या खड्ड्यांमुळे वाढते अपघात पाहता बळी गेल्यास त्यास कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो टिष्ट्वट केले आहेत.
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’, असे आवाहन करताय. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे. याबाबत या राज्यमार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनधारकांना भयंकर यातना सहन कराव्या लागत आहेत. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेला सार्वजनिक बाधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या वाहनधारकांचा बळी घेतल्याशिवाय खड्डे बुजविणार नाही, अशी प्रतिज्ञा तर अधिकाऱ्यांनी घेतली नसावी? याच महामार्गावर अनेकवेळा किरकोळ अपघात झालेले आहे व खड्डे बघायचे असतील तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावल ते किनगाव प्रवास मोटारसायकलीने करावा, असे प्रति आवाहनही कुलदीप पाटील यांनी केले आहे.