या नेत्याने शिंदे सेनेच्या नेत्याला ठणकावले!
By अमित महाबळ | Published: August 31, 2023 06:34 PM2023-08-31T18:34:09+5:302023-08-31T18:36:01+5:30
जनतेची दिशाभूल कोणी करू शकत नाही. त्यांनी त्यांच्या भाषणाची स्टाईल बदलावी.
जळगाव : जनतेची दिशाभूल कोणी करू शकत नाही. त्यांनी त्यांच्या भाषणाची स्टाईल बदलावी. बहिणाबाई आणि बालकवी ठोंबरे यांचे स्मारक कोणी केले हे सर्वांना माहित आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी शिंदे सेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता त्यांना ठणकावले. ते गुरुवारी, पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
शरद पवार यांची दि. ५ सप्टेंबर रोजी, जळगाव शहरात सभा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यात दोन महत्वाच्या स्मारकांच्या कामांवरून वाक् युद्ध रंगले आहे. त्याचा संदर्भ घेत त्यांनी दिशाभूल न करण्याचा इशारा शिंदे सेनेच्या नेत्यांना दिला. आपल्याला देवकरांना आमदार व मंत्री करायचे आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
जळगावची ताकद दाखवून देऊ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात फिरून पक्षाच्या सभा घेत आहेत. त्यांना आपल्याला ताकद द्यायची आहे. येवला, बीड यापेक्षा जळगावची सभा मोठी झाली पाहिजे, असे आवाहन पक्षाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला त्यावेळी जनतेची सहानुभूती त्यांना मिळाली. आपल्या पक्षाचे विभाजन झाले, आताही जनता आपल्यासोबत उभी राहिली आहे, असेही देवकर म्हणाले.