या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया
By सचिन देव | Published: March 22, 2023 05:50 PM2023-03-22T17:50:32+5:302023-03-22T17:52:43+5:30
यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव: मागील पाच वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने चालक-वाहकांना दिलेल्या गणवेशाबाबत राज्यभरातून चालक-वाहकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर, महामंडळाने हा ठेका रद्द करून, मुदतवाढ दिली नव्हती. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पाच वर्षांत एकदाही गणवेश मिळाला नव्हता. मात्र, एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांना रेडिमेड गणवेश न देता, कापड देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड देऊन, शिलाई भत्ताही दिला जात होता. मात्र, २०२७ मध्ये ही प्रथा बंद करून, महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना रेडिमेड गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी एका खासगी संस्थेशी करार करून, कर्मचाऱ्यांचे गणवेश शिवण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे कापड व हा गणवेश अनेक कर्मचाऱ्यांना व्यवस्थित बसत नसल्यामुळे, राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी या गणवेशाबद्दल मोठ्या संख्येने महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. यावर महामंडळाने ही पद्धत बंद केली होती. मात्र, त्यानंतर महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशच दिले नसल्याने, कर्मचाऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत होता. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध मागण्या मान्य करताना, कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे गणवेश देण्याची पद्धतही मान्य केली होती. त्यामुळे महामंडळातर्फे पुन्हा आता पूर्वीप्रमाणे कर्मचाऱ्यांना कापड व शिलाई भत्ता देऊन गणवेश देण्यात येणार आहे.
तर २५० रुपयांमध्ये गणवेश कसा शिवणार.. -
महामंडळाने पूर्वीप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना कापड व २५० रुपये शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढत्या महागाईनुसार एक गणवेश शिवण्यासाठी सध्या शिलाईचे दर ५०० रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे २५० रुपयांमध्ये गणवेश कसा शिवणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात असून, शिलाई भत्ता वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
एसटी महामंडळाने एसटीच्या चालक, वाहक व इतर कर्मचारी बांधवांना गणवेश देण्यासाठी कापड खरेदीची निविदा प्रक्रिया काढली आहे. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी चांगल्या दर्जाचा कापड उपलब्ध करून दिला जाणार आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात कर्मचाऱ्यांना गणवेशाचे नवीन कापड उपलब्धकरून दिले जातील.
शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.