‘त्या’ ३० नगरसेवकांनी केली राजकीय आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:20+5:302021-05-31T04:14:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय आत्महत्या केली असून, लवकरच भाजपमधून फुटून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी बालाणी लॉनवर झालेल्या बैठकीत दिली आहे.
शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा धमाका सुरूच आहे. शनिवारी भाजपचे तीन नगरसेवक फोडल्यानंतर रविवारी भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या उर्वरित २७ नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सर्व २७ नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला गिरीश महाजन यांनी सर्व नगरसेवकांना त्यांची पक्षाबद्दल असलेली नाराजी व्यक्त करण्याचे जाहीरपणे सांगितले. तसेच ज्या नगरसेवकांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी नाराजीचे कारण देखील सांगावे, असेही महाजन यांनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितले. पक्षाने ज्या नगरसेवकांवर विश्वास टाकला, त्या नगरसेवकांनी पक्षाचा विश्वासघात करून आपल्या पायावर धोंडा मारण्याचे काम केले आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वच यामुळे धोक्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच कामकाज करून, त्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिकपणे केली नगरसेवकांशी चर्चा
महाजन यांनी या बैठकीनंतर काही नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चादेखील केली. तसेच महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पक्षाने जे प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांवर काही पैशांसाठी पाणी फिरू देऊ नका, असेही आवाहन महाजन यांनी केले. दरम्यान, १ जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौर्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नगरसेवकांना काही सूचना दिल्या. बैठकीत स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.