दुचाकीवरुन आलेल्यांनी सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:15 PM2019-08-07T12:15:26+5:302019-08-07T12:15:55+5:30
मंदिरातून घरी येत असताना घडली घटना
जळगाव : मंदिरातून घराकडे पायी परतत असतांना वंदना किरण खानावले (५७ रा. पार्वतीनगर) यांची १५ ग्रॅमची ५० हजार रुपये किंमतीची गळ्यातील सोन्याची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना महाबळ परिसरातील विद्या नगरात सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी खानावले यांनी मंगळवारी पोलिसात तक्रार दिली आहे.
शहरातील पार्वतीनगर येथे वंदना खानावले या प्लॉट क्र.१५ येथे मुलगा अमोल खानावले यांच्या सोबत वास्तव्यास आहेत. अमोल खानावले हे बँकेत नोकरीला आहेत.
महाबळ परिसरातील रामदास मंदिर येथे वंदना खानावले यांचा पाठ सुरु सुरु आहे. त्यासाठी त्या नियमित पार्वतीनगर येथून विद्यानगरातील रोटरी भवन मागील रस्त्याने पायी येत जात असतात.
सोमवारी सकाळी वंदना खानावले त्यांच्या वहिनी वासंती फाथे यांच्यासोबत गेल्या होत्या. तेथून परत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मंगलपोत तोडून पलायन केले.
वंदना व वासंती या दोघांनी आरडाओरड केली मात्र,उपयोग झाला नाही. दरम्यान, यापूर्वी देखील या परिसरात सोनसाखळी लांबविण्यात आली होती.
सीसीटीव्ही कैद झाले चोरटे
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर कोळी, रुपेश ठाकरे यांनी खानावले यांना सोबत घेत मंगळवारी घटनास्थळ गाठले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. यातील एका सीसीटीव्हीत दुचाकीवरील दोघे चोरटे कैद झाले आहेत, मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकीवर मागे बसलेल्याने पोत लांबविली आहे.त्याने पिवळा रंगाचा त्यावर काळे ठिपके असलेला शर्ट घातलेला होता तर दुचाकी चालवित असलेल्याने राखी कलरचा कोट घातलेला असल्याचे वर्ण खानावले यांनी पोलिसांना सांगितले.