मीटररमध्ये फेरफार करून विजेची चोरी करणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:43+5:302021-02-11T04:18:43+5:30
जळगाव : महावितरण प्रशासनाने बुधवारी एमआयडीसीतील रामनगर परिसरात दुपारी अचानक ग्राहकांच्या घरोघरी जाऊन वीजमीटरची तपासणी केली असता, नऊ ग्राहकांनी ...
जळगाव : महावितरण प्रशासनाने बुधवारी एमआयडीसीतील रामनगर परिसरात दुपारी अचानक ग्राहकांच्या घरोघरी जाऊन वीजमीटरची तपासणी केली असता, नऊ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून विजेची चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आकोडे टाकून विजेची चोरी करणाऱ्या नऊ किरकोळ व्यावसायिकांचे आकडे जप्त करण्यात आले आहे.
महावितरण प्रशासनाने सध्या थकबाकीदार ग्राहक आणि वीजचोरांवर धडक कारवाई मोहीम राबविली आहे. मंगळवारी राजीव गांधी नगरात दीडशे वीजचोरांचे आकोडे जप्त केल्यानंतर, बुधवारी रामनगरमध्ये मीटर तपासणी मोहीम राबविण्यात आली. सहायक अभियंता सुरेश पांचगे व त्यांच्या पथकातील कर्मचारी सुरेखा डोळे, शिवहारी शेगोकर, चंद्रकांत चौधरी यांनी ही मोहीम राबविली. महावितरण प्रशासनाने या भागातील नागरिकांचे मीटर घरात न ठेवता, घराबाहेरील विद्युत खांब्यावर स्वतंत्र अशी डीपी उभारुन बसविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी महावितरणचे कर्मचारी बुधवारी दुपारी रामनगरमध्ये गेले असता, त्यांना या परिसरात विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मीटरची तपासणी केली. यामध्ये २० जणांची मीटर ताब्यात घेण्यात आले असून, या नऊ नागरिकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले. या नागरिकांनी फेरफार केल्यामुळे, युनिट फिरण्याची गती कमी केल्याचे आढळून आले.
या सर्व नागरिकांचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मीटर जप्त केले आहेत.
इन्फो :
आज ठोठावणार दंड :
मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरीप्रकरणी या ग्राहकांना मागील दोन वर्षांपासून विजेचा सरासरी वापर लक्षात घेऊन दंड ठोठावण्यात येणार आहे. या दंडाची रक्कम २४ तासात भरण्याची मुदत असून, अन्यथा या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कृऊबामधूनही पाच आकडे जप्त :
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खाद्य पदार्थ व इतर व्यवसाय करणारे पाच व्यावसायिक आकडे टाकून विजेची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सर्वांचे आकोडे जप्त करण्यात आले. या व्यावसायिकांना गुरुवारी दंडात्मक कारवाईबाबत नोटिसा बजाविण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता सुरेश पांचगे यांनी सांगितले. तसेच थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीज बिल भरावे, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांवरही महावितरणतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे पांचगे यांनी सांगितले.