‘त्या’ तीनही पोलिसांवर निलंबनाची कोसळणार कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:07 PM2019-06-16T12:07:19+5:302019-06-16T12:10:56+5:30
जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील या तीनही पोलिसांवर निलंबनाचीही कु-हाड कोसळणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.
जळगाव: जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील या तीनही पोलिसांवर निलंबनाचीही कु-हाड कोसळणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.
चंद्रकांत सुरेश पाटील या तरुणाचा १४ मे २०१५ रोजी चाकूने भोसकून खून झाला होता. याप्रकरणात चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याच्यासह सहाजणांविरुध्द दाखल झाला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १३ जून रोजी या खटल्याची न्यायालयात तारीख होती. त्यासाठी चिंग्याला कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या दिमतीला मुख्यालयाचे हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉन्स्टेबल गोरख हिंमतराव पाटील हे कर्मचारी देण्यात आले होत. सकाळी १०.३५ ला चिंग्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले तर रात्री ११ वाजता त्याला परत कारागृहात नेण्यात आले होते. या कालावधीत त्याने मद्यप्राशन करुन अरुण भीमराव गोसावी यांना मारहाण केली होती. याप्रकरणात चिंग्या, त्याचा साथीदार व तीन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी रात्री या पोलिसांना अटक करण्यात आली.
चिंग्याला इतरत्र हलविणार?
चिंंग्याच्या तक्रारी व वारंवार होणारे प्रकार पाहता त्याला नाशिक किंवा पुणे कारागृहात हलविण्यात येण्याची शक्यता असून कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी तसे संकेतही दिलेले आहेत. प्रभारी अधीक्षक अनिल वांढेकर यांनी प्राथमिक माहिती वरिष्ठांना कळविलेली आहे. कारागृहात झालेल्या प्रकाराला कारागृह प्रशासन जबाबदार असते, तर न्यायालयीन तारखेवर आरोपीला बाहेर घेऊन जाताना मुख्यालयाच्या पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. तशा येण्याच्या व जाण्याचा नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे बाहेर झालेल्या प्रकाराला पोलीसच जबाबदार असले तरी अंतर्गत प्रकरणाचीही माहिती मागविल्याचे देसाई यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
न्यायालयातील काम झाल्यानंतर चिंग्या खासगी कारने (क्र.एम.एच.१९ सी.यु.८५००) शहरात फिरल्यानंतर रात्री तुकारामवाडीत गेला होता. चुलत सासरे व पत्नीला भेटल्यानंतर रात्री ९.४० वाजता तो घराबाहेर पडला. नंतर गल्लीत बाहेर थांबलेल्या अरुण भिमराव गोसावी (४३, रा.तुकारामवाडी) यांना चिंंग्या, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे (शिवाजी नगर) व त्याच्या दिमतीला असलेल्या पोलिसांनी मारहाण केली त्यानंतर कारमध्ये डांबून ठेवत कारागृहाच्या बाहेरही मारहाण केल्याची तक्रार गोसावी यांनी दिल्यावरुन एमआयडीसी पोलिसात तीन पोलीस, चिंग्या व त्याचा साथीदार गोलु यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.