लक्षणे नसलेल्यांसाठी आता इकराचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:40+5:302021-01-13T04:39:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याने आता लक्षणे नसलेल्या रुग्णांची शासकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याने आता लक्षणे नसलेल्या रुग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी वाढू लागल्याने इकरा वैद्यकीय महाविद्यालयात पर्ययी व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून डॉक्टरांनी याबाबत आढावाही घेतला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल ६० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४० रुग्ण आहेत. यामुळे गंभीर रुग्णांसाठी ऐनवेळी बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. या ठिकाणी केवळ गंभीर रुग्ण दाखल करण्याचे अगदी सुरूवातीपासून आदेश होते. त्यामुळे या ठिकाणी गंभीर रुग्णच दाखल व्हावे, अशी भूमिका स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, मध्यंतरी शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या दहाच्या खाली आल्याने या ठिकाणी पूर्ण यंत्रणा लावणे महापालिकेला शक्य नसल्याने हे रुग्ण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येत होते. अखेर या रुग्णांना इकरा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येणार असून गंभीर रुग्णांनाच जीएमसीत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, समन्वयाची जबाबदारी डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवाय इकरा महाविद्यालयात काही स्टाफही देण्यात येणार आहे.