मुख्य सचिवांनी दिलेली मुदत संपली तरीही जळगाव जिल्ह्यात पंचनामे धीम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:50 PM2019-11-09T19:50:11+5:302019-11-09T19:53:05+5:30
शेतकरी हवालदिल
जळगाव: राज्यात राजकीय नेतेमंडळी सरकार स्थापण्याच्या घोळात अडकलेली असल्याचा लाभ प्रशासकीय यंत्रणा उचलताना दिसत असून राज्याच्या मुख्य सचिवांनी ६ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे व अपवादात्मक स्थितीत ८ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असताना अद्यापही पंचनाम्यांचे काम धीम्यागतीने सुरूच आहे. सोमवार, ११ नोव्हेंबरपर्यंत ही आकडेवारी अंतीम ह ोण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदील झाला असून शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली़ मुख्य सचिवांनी ६ तारखेपर्यंत व जास्तीत जास्त ८ तारखेपर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत तब्बल ५ लाख ३८ हजार १२३ हेक्टरवरील म्हणजेच ८९ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. शनिवारी उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र शनिवारी देखील हे पंचनामे पूर्ण झालेले नव्हते. हे काम सोमवार, ११ तारखेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.