रेशन दुकान नावावर करण्यासाठी घेतली ४० हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:06 PM2020-03-18T13:06:14+5:302020-03-18T13:06:56+5:30

पुरवठा विभागातील दोन महिला लिपिकासह चार जण जाळ्यात, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची चौकशी

A thousand bribe was taken to name a ration shop | रेशन दुकान नावावर करण्यासाठी घेतली ४० हजाराची लाच

रेशन दुकान नावावर करण्यासाठी घेतली ४० हजाराची लाच

Next

जळगाव : आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेले रेशन दुकान वडीलांच्या नावावर करण्यासाठी ४० हजाराची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा पुरवठा विभागातील अव्वल कारकून प्रमिला भानुदास जावळे (५७, रा.भुसावळ), पूनम अशोक खैरनार (३७, रा.जळगाव), हमालांचा कत्राटदार प्रकाश त्र्यंबक पाटील (५५, रा. जाकीर हुसेन कॉलनी) व खासगी व्यक्ती योगेश नंदलाल जाधव (३३, रा.गुजराल पेट्रोल पंपाजवळ) या चौघांना मंगळवारी दुपारी १ वाजता पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी पाचारण केले होते. या लाचप्रकरणात त्यांचा संबंध आहे का? याची चौकशी केली जात आहे.
भुसावळ येथील २५ वर्षीय तरुणाच्या आजोबांच्या नावावर भुसावळ शहरात रेशन दुकान आहे. त्यांच्या आजोबांचे निधन झाल्याने हे दुकान वडीलांच्या नावावर करण्यासाठी या तरुणाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. ही प्रक्रिया करुन देण्यासाठी अव्वल कारकून प्रमिला जावळे व पूनम खैरनार यांनी ११ मार्च रोजी ४० हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार केली. ठाकूर यांनी सलग तीन दिवस तक्रारीची पडताळणी केली.
कार्यालयाच्या आवारातच सापळा
लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर जी.एम.ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनील पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी व ईश्वर धनगर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच सापळा रचला. हमालांचा कत्राटदार प्रकाश पाटील व योगेश जाधव यांच्याहस्ते लाच घेताना चौघांना पकडण्यात आले.
पुरवठा अधिकारी पाचारण
या घटनेशी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी पाचारण केले होते. या लाचप्रकरणात त्यांचा संबंध आहे का? याची चौकशी केली जात आहे. संबंध आढळून आला तर त्यांनाही आरोपी केले जाईल, अशी माहिती उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी दिली.

Web Title: A thousand bribe was taken to name a ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव