जळगावात डोळ्यात मिरची टाकून व पिस्तुल रोखून हवालाचे सहा लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:13 PM2017-12-23T23:13:20+5:302017-12-23T23:19:33+5:30
डोळ्यात मिरची पावडर तर डोक्यात लोखंडी रॉड टाकून पिस्तुल रोखून दिलीप दशरथभाई पटेल (वय ४०, रा. प्लॅट क्र.१, पद्मालया अपार्टमेंट, प्रेम नगर पिंप्राळा रोड, जळगाव) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी पटेल यांच्या घरासमोरच घडली. ही रक्कम हवालाची असल्याचे खुद्द पटेल यांनीच सांगितले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२३: डोळ्यात मिरची पावडर तर डोक्यात लोखंडी रॉड टाकून पिस्तुल रोखून दिलीप दशरथभाई पटेल (वय ४०, रा. प्लॅट क्र.१, पद्मालया अपार्टमेंट, प्रेम नगर पिंप्राळा रोड, जळगाव) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी पटेल यांच्या घरासमोरच घडली. ही रक्कम हवालाची असल्याचे खुद्द पटेल यांनीच सांगितले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप पटेल व त्यांचे सहकारी प्रवीण भाई पटेल हे हवालाचे व्यवहार करतात. शनिवारी सायंकाळी सात वाजता दिलीप पटेल यांनी बी.जे.मार्केटमधील तिरुपती पाईप नावाच्या हवालाच्या कार्यालयातून धीरज भाई यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. ते कापडात गुंडाळून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर प्रवीणभाई पटेल यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.१९-४५१३) घरी येण्यासाठी निघाले. घरी येताच अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळच ७.२५ वाजता दोन जणांनी या दोघांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले, त्यामुळे दोघंही गोंधळले तर एका चोरट्याने दिलीप पटेल यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. हा प्रकार पाहून प्रवीणभाई तेथून धावतच कंपाऊडमध्ये आले व आरडाओरड करायला लागले. डिक्कीत पैसे असल्याने दिलीप यांनी दुचाकी सोडली नाही, त्यामुळे एका जणाने त्यांच्यावर पिस्तुल रोखले. त्यामुळे घाबरुन दिलीप यांनी दुचाकी सोडली. क्षणाचाही विलंब न करता डिक्कीतील सहा लाखाची रोकड घेऊन चोरट्यांनी महामार्गाच्या दिशेन पलायन केले.
पटेल यांच्याआधी चोरटे पोहचले घराजवळ
पटेल हे घरी पोहचण्याआधी हे चोरटे त्यांच्या घराजवळ पोहचले होते. रेल्वे रुळाच्या दिशेने विरुध्द बाजूने त्यांनी दुचाकी लावली होती. तर कंपाऊडच्या गेटजवळ भींतीला लागून हे चोरटे थांबलेले होते. पटेल हे कंपाऊडच्या गेटजवळ येताच चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. फक्त दोन मिनिटाच्या आतच चोरट्यांनी हा खेळ केला.